उमेदवारीवरून औरंगाबाद ‘मध्य’ची धुसफूस थेट मातोश्री वर; पूर्व मतदारसंघही घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:42 PM2024-10-22T12:42:02+5:302024-10-22T12:43:00+5:30
विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून उद्धव सेनेत धुसफूस सुरूच आहे. ‘मध्य’ मतदारसंघातील सुमारे दीडशे पदाधिकारी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळावी म्हणून थेट मुंबईत ‘मातोश्री’वर गेले आहेत. दुसरीकडे पूर्व विधासभा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घ्यावा, यासाठी पदाधिकारी जोर लावत आहेत. यासंदर्भात महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी मंगळवारी (ता. २२) सायंकाळी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला जिल्ह्यात सहा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील ‘मध्य’ मध्ये जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी तर पश्चिम विधासभा मतदरासंघात राजू शिंदे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे. ‘मातोश्री’ने त्यांना कामाला लागण्याची सूचना केली. त्यामुळे ‘मध्य’ मतदारसंघात तयारी करणारे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात नाराज असून, त्यांनी आपल्या समर्थकांची नुकतीच बैठक घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सोमवारी सुमारे शंभर ते दीडशे पदाधिकारी घेऊन थोरात यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले. रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण बैठकीत काय निर्णय झाला? हे मात्र, समजू शकले नाही.
पूर्व मतदारसंघात आज बैठक
पूर्व मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी पुढील दिशा काय ठरवायची? याचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी पूर्व मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची सायंकाळी पाच वाजता शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांच्या सिडको एन-७ येथील कार्यालयात बैठक बोलविली आहे.