मंगळसूत्र चोरटे आहेत पोलिसांच्याही एक पाऊल पुढे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:53 PM2019-04-30T12:53:27+5:302019-04-30T12:55:28+5:30

चोरटे शहराबाहेरील असण्याची शक्यता

In Aurangabad city chain snatcher is a step ahead of the police | मंगळसूत्र चोरटे आहेत पोलिसांच्याही एक पाऊल पुढे...

मंगळसूत्र चोरटे आहेत पोलिसांच्याही एक पाऊल पुढे...

googlenewsNext
ठळक मुद्देचोरी करण्याची प्रत्येक वेळी बदलताहेत वेळ पोलिसांसमोर आव्हान 

औरंगाबाद : शहरात २४ एप्रिल रोजी सकाळी अवघ्या पाऊण तासात दुचाकीस्वार चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. मागील तीन महिन्यांत मंगळसूत्र चोरीच्या सुमारे १० घटना घडल्या. मात्र, प्रत्येक वेळी चोरटे पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेळा निवडत असल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. चोरटे पोलिसांच्याही एक पाऊल पुढे असल्याचे दिसत आहे. 

लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या २ चोरट्यांनी बीड बायपास परिसर, सिडको आणि सेव्हनहिल आदी ठिकाणी वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. याआधी सिडको एन- ८, पुंडलिकनगर, उल्कानगरी, गारखेडा परिसर, समर्थनगर आदी वसाहतींमध्ये सुमारे दहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या तीन महिन्यांत चोरट्यांनी हिसकावून नेल्या. विशेष म्हणजे मंगळसूत्र चोरटे अनेकदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्र चोरटे शहराबाहेरील असावेत. ते प्रत्येक वेळेस वेळ बदलतात.

विशेषत: सकाळी सहा ते आठ वाजेदरम्यान पोलीस रस्त्यावर नसतात, रात्रपाळी करणारे गस्तीवरील पोलीस पहाटे साडेचार ते पाच वाजेनंतर घरी जाऊन झोपतात. ही बाब चोरट्यांनी चांगल्याप्रकारे हेरल्याने बहुतेक मंगळसूत्र चोरीच्या घटना सकाळच्या सुमारास घडल्या आहेत. दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारासही उन्हामुळे पोलीस रस्त्यावर नसतात. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी चोरट्यांनी गारखेडा आणि शास्त्रीनगर येथे दोन शिक्षिका महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. 

यापूर्वी रात्री सात ते साडेसातच्या सुमारास चोरट्यांनी उल्कानगरी परिसरातून महिलांचे मंगळसूत्र पळविल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या सर्व घटना घडल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि गुन्हेशाखेचे कर्मचारी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेतात. मात्र चोरटे धूमस्टाईल पळून जाण्यात यशस्वी होतात.

Web Title: In Aurangabad city chain snatcher is a step ahead of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.