औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ च्या वर गेलेच नाही...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:40 AM2018-05-09T00:40:37+5:302018-05-09T00:41:12+5:30
उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.
ऋचिका पालोदकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उन्हामुळे जनता त्रस्त झाली असून तापमान वाढीचे मोठमोठे आकडे सर्वत्र दाखविले जात आहेत. एकीकडे औरंगाबाद शहरातले तापमान ४२ डिग्री सेल्सिअसच्या वर गेले, असा हाकारा पिटत हवामानाशी संबंधित विविध संस्था सांगत असताना औरंगाबाद शहराचे तापमान ३८.६ डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेच नाही, असा दावा महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना श्रीनिवास औंधकर म्हणाले की, सध्या तापमान वाढ अशी सर्वत्र ओरड केली जात आहे; पण ही सगळी कृत्रिम तापमान वाढ असून हवेतील आर्द्रता कमी झाल्याचा हा परिणाम आहे. यामुळे शुष्कता निर्माण होऊन कोरडे वारे वाहतात, त्यामुळे उष्णता जास्त वाटते; पण शहरातील तापमानाने अजून चाळिशीही ओलांडली नसून येत्या काळातही अशी शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नाही, असा विश्वासही औंधकर यांनी दिला.
ते म्हणाले की, एमजीएम येथील हवामान यंत्रणा ही स्वयंचलित हवामान केंद्रांच्या जागतिक परिमंडळाशी जोडली गेलेली आहे. त्या यंत्रणेवर मंगळवारी (दि.८) दुपारी तीन वाजता शहराचे तापमान ३५.४ दाखविले जात होते आणि स्कायमॅट या संस्थेद्वारे हेच तापमान ४० डिग्री सेल्सिअस दाखविले गेले. दोन संस्थांनी दाखविलेल्या तापमानाचा हा फरक मात्र जनसामान्यांना बुचकळ्यात टाकणारा आहे. वाढते सिमेंट काँक्रिटीकरण, वृक्षतोड, प्रदूषण यामुळे शहरी भागात कृत्रिम तापमानात वाढ झाल्याचे औंधकर यांनी सांगितले. एमजीएम संस्थेचीच एक हवामान यंत्रणा गांधेली परिसरात बसविलेली आहे. हा भाग शहराच्या बाहेर येत असल्यामुळे तेथील तापमान हे शहरातील तापमानापेक्षा एक ते दीड डिग्री सेल्सिअसने कमी असलेले आढळून आले. मंगळवारी दुपारी तीन वाजता जेव्हा शहराचे तापमान ३५.४ डिग्री सेल्सिअस होते तेव्हा गांधेली परिसरातील तापमान ३४.७ डिग्री सेल्सिअस मोजले गेले.
पुढच्या आठवड्यात पूर्वमान्सून बरसणार
उन्हाळा संपत आला असून पुढच्या आठवड्यात १४ मेच्या आसपास पूर्व मान्सून सरी बरसणार असा अंदाज व्यक्त करून औंधकर यांनी उन्हाने त्रस्त झालेल्या जनसामान्यांना एक सुखद दिलासा दिला आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमीच तापमान
मागच्या वर्षी सर्वाधिक तापमान ३९.४ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले होेते. यंदा मात्र त्या तुलनेत कमीच तापमान आहे. ग्लोबल वार्मिंग होत नसून ग्लोबल कूलिंग होत आहे, असे आपण मानतो आणि तापमानातला हा फरकही तेच सांगतो, असेही औंधकर यांनी नमूद केले.