Imtiaz Jaleel: हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा!, सरकारी परिपत्रकात औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख होताच इम्तिजाय जलील भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:09 PM2021-10-23T17:09:21+5:302021-10-23T17:10:30+5:30
राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले आहेत.
राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्यानं एमआयएम (MIM) पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चांगलेच संतापले आहेत. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवावं, असा थेट इशाराच इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. यासोबतच ज्या अधिकाऱ्यांनी परिपत्रकात औरंबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केला त्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेकडून नेहमीच औरंगाबदाचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. तर काँग्रेसचाही संभाजीनगर नावाला विरोध आहे. शहराचं केवळ नाव बदलून काही शहराचा विकास होत नाही. खरंतर नामांतराऐवजी औरंगाबादमधील पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं थेट आव्हान जलील यांनी दिलं आहे.
याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरुन एका घोषणेच्या बॅनरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यावेळीही शहराच्या नामांतराचा मुद्दा खूप गाजला होता. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानं काँग्रेसमध्येही नाराजी पसरली होती. बाळासाहेब थोरात यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कोणत्याही शहराचा सामाजिक सलोख टिकून राहावा यासाठी शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी ठणकावून सांगितलं होतं.