शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 02:21 PM2021-02-09T14:21:34+5:302021-02-09T14:23:47+5:30
Aurangabad City police marathon Nakabandi गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत.
औरंगाबाद : गेल्या काही दिवसापासून शहरात मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत चौकाचौकात आणि विविध रस्त्यावर बॅरिकेड लावून नाकाबंदी केली. पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी या नाकाबंदित सहभागी झाले होते.
गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत. घटना घडल्यानंतर पोलिसाकडून नाकाबंदी केली जाते,याचा मात्र फारसा उपयोग होताना दिसत नाही. परिणामी मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरी करणारे मोकाट फिरत आहेत. वाढलेल्या घटनांमुळे शहरातील दुचाकीचालक त्यांच्या भावना बद्दल चिंतीत असतात. मंगळसूत्र चोरीला जाते की काय? या भीतीपोटी महिलांच्या मनातही चोरट्यांची धास्ती बसली आहे.
या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत शहराच्या सर्वच रस्त्यावर चौकाचौकात नाकाबंदी केली. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दिपक गिऱ्हे, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि शहरातील १७ पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक पोलिस ठाणे अंतर्गत पाच ठिकाणी बॅरिकेट्स लावून नाका-बंदी केली जात होती. येणाऱ्या-जाणाऱ्या संशयित वाहने अडवून ही वाहने तपासली जात होती. ज्या वाहनचालकाकडे वाहनमालकीची कागदपत्रे नाहीत अशी वाहने जप्त केली जात होती.