औरंगाबादेत प्राध्यापकाचे बंद घर फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:11 AM2018-02-13T00:11:46+5:302018-02-13T00:11:51+5:30
रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील सात दिवसांपासून बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी १४ तोळे सोन्याचे दागिने, सव्वाकिलो चांदीचे ताट, वाटी आणि रोख १ लाख २५ हजार रुपये असा सुमारे साडेपाच ते सहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील सात दिवसांपासून बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी १४ तोळे सोन्याचे दागिने, सव्वाकिलो चांदीचे ताट, वाटी आणि रोख १ लाख २५ हजार रुपये असा सुमारे साडेपाच ते सहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बन्सीलालनगरमधील द्वारकापुरी कॉलनीमध्ये राहणारे राहुल प्रदीप अग्रवाल हे एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय आहे. दिल्ली येथे नातेवाईकाचा विवाह समारंभ असल्याने अग्रवाल सहपरिवार ४ फेबु्रवारीला शहरातून बाहेर पडले. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रविवारी दुपारी ३ वाजता घरी परतले, तेव्हा चोरीचा प्रकार उघड झाला. त्यांनी वेदांतनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक अनिल आढे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे पथकासह तेथे दाखल झाले. चोरट्यांनी मोठ्या शिताफीने ही घरफोडी केल्याचे समोर आले. प्रा. अग्रवाल यांच्या बंगल्याच्या शेजारी एका घराचे बांधकाम सुरू आहे. बंगल्याच्या मागील वॉल कम्पाऊंडवरून चोरट्यांनी आवारात प्रवेश केला. स्वयंपाक घराच्या खिडकीचा गज कापला. एका बाजूने कापलेला गज वाकविल्यानंतर सडपातळ शरीराच्या मुलाला त्याने आत सोडले असावे. नंतर दार उघडून आत प्रवेश केला. बेडरूमचे लॉक तोडून त्यांनी जुन्या पद्धतीची लोखंडी आलमारी तोडली. त्यातील चाव्या घेऊन अत्यंत मजबूत एक लॉकर उघडून त्यातील चांदीचे दागिने आणि अन्य वस्तू घेतल्या; मात्र दुसºया लॉकरची चावी न सापडल्याने त्याने लोखंडी टॉमीने लॉकर तोडले. या लॉकरमधील सोन्याचे अलंकार त्यांनी घेतले. यानंतर त्यांनी बेडक डे मोर्चा वळविला. बेडखालील कप्प्यात पिशवीत अग्रवाल कुटुंबियांनी ठेवलेली सव्वालाखाची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. त्यांनी तेथील सर्व पिशव्या उचकल्या. तळमजला साफ केल्यानंतर चोरटे वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेले. तेथील बेडखालील ड्रॉवरची उचकापाचक चोरट्यांनी केली; मात्र तेथे किमती ऐवज नव्हता.
मुलीच्या लग्नासाठी होती रक्कम
अग्रवाल कुटुंबांनी मुलीच्या लग्नासाठी आधीच काही दागिने तयार करून ठेवले होते. शिवाय तिच्या लग्नासाठी त्यांनी जमा केलेली पै- पै रक्कमही चोरट्यांनी लांबविल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण
पोलिसांचे श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आठ दिवसांपासून घर बंद असल्याने साचलेल्या धुळीमुळे चोरट्यांचे ठसे तज्ज्ञांना सहज मिळाले. श्वानाला मात्र फारसा माग काढता आला नाही.