औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालयात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 04:18 PM2020-08-10T16:18:36+5:302020-08-10T16:48:17+5:30
औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.
औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव पदी बदली झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक आणि कोरोना प्रादुर्भाव यामुळे त्यांची बदली लांबली होती. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रभावी काम झाल्यामुळे राज्य शासनाने चौधरी यांच्या बदलीचा विचार केला असल्याची चर्चा आहे. उदय चौधरी यांनी एप्रिल २०१८ मध्ये औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्या आधी ते सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
उदय चौधरी यांची गेल्या वर्षीच बदली होणार होती; परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेक लागला. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये प्रशिक्षण घेऊन आल्यानंतरच चौधरी यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. ते १५ मार्च रोजी प्रशिक्षणावरून आले आणि त्यादरम्यानच कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने उपाययोजनांची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची बदली होऊ शकली नव्हती. त्यांच्या जागेवर येण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा असल्याची माहिती असून यामुळे औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुंबईत बदली pic.twitter.com/dHKrksd5B8
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 10, 2020
कोरोना काळात प्रभावी काम
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना झाल्या असून, पूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहे. त्यामुळे नवीन बदलून येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना येथे काम करताना काहीही अडचणी येणार नाहीत, अशी शासनाची धारणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी चौधरी यांची येथून बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
उदय चौधरी यांचा अल्प परिचय
मुळचे जळगाव येथील चौधरी यांची प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीपासून सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरु झाली. वर्धा, ठाणे येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तमप्रकारे कामगिरी बजावली. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द असलेल्या चौधरी यांनी बी.टेक (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली असून सन 2010 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली.