MHADA पेपरफुटीचे औरंगाबाद कनेक्शन; कोचिंग क्लासचे तीन संचालक पुणे पोलीसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:13 PM2021-12-13T12:13:41+5:302021-12-13T12:14:56+5:30

आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

Aurangabad connection of MHADA Paper leak case; Pune police arrested three coaching class directors | MHADA पेपरफुटीचे औरंगाबाद कनेक्शन; कोचिंग क्लासचे तीन संचालक पुणे पोलीसांच्या ताब्यात

MHADA पेपरफुटीचे औरंगाबाद कनेक्शन; कोचिंग क्लासचे तीन संचालक पुणे पोलीसांच्या ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट रविवारी पुणे येथील सायबर गुन्हे शाखेने उधळला. याचे औरंगाबाद कनेक्शन उघडीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी शहरातील दोन क्लासचे संचालक आणि एकाला ताब्यात घेतले आहे. आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका फूट प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 


म्हाडाच्या विविध पदांसाठीच्या रविवारी होणार असलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पुण्यातील जी. ए. साॅफ्टवेअरचे संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख यांना सोपविण्यात आले होते. त्यांनीच प्रश्नपत्रिका फोडण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या परीक्षांना सुमारे अडीच लाख परीक्षार्थी बसणार होते. आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवार परीक्षेसाठी रविवारी सकाळी राज्यातील विविध केंद्रांवर पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे कळल्याने त्यांना मोठा मन:स्ताप झाला. त्यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

पोलिसांंनी शनिवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत जी. ए. साॅफ्टवेअरचा संचालक  डाॅ. प्रीतिश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी, पुणे), अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. तिघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हाडाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. रविवारी आयोजित म्हाडाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फोडण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने ओैरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे परिसरातील संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.

आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पाॅइंट या संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव व त्यांचा सहकारी अंकित चनखोरे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे म्हाडा परीक्षेतील ३ उमेदवारांची प्रवेशपत्रे, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील ३५ उमेदवारांच्या नावांची यादी सापडली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत डॉ. प्रीतिश देशमुख यांची माहिती मिळाली.

पुण्यात वास्तव्यास असलेले संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांनी म्हाडाची प्रश्नपत्रिका फोडून ती उमेदवारांना देण्याची तयारी सुरू केली होती. सायबर गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. विश्रांतवाडी येथे हरकळ आणि डॉ. देशमुख गाडीतून निघाले होते. पोलिसांच्या पथकाने गाडी अडवून तिघांना ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याकडे लॅपटॉप, ७ मोबाइल, पेन ड्राइव्ह, इतर कागदपत्रे सापडली. पेन ड्राइव्हमध्ये म्हाडाच्या तीनही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आढळल्या.

Web Title: Aurangabad connection of MHADA Paper leak case; Pune police arrested three coaching class directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.