औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत होणार वाढ; ५ फेब्रुवारीपासून होणार मुंबईसाठी ‘इंडिगो’चे ‘टेकऑफ ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 06:10 PM2019-12-25T18:10:21+5:302019-12-25T18:12:44+5:30

मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठी घेणार ‘उड्डाण’

Aurangabad connectivity will increase; IndiGo 'Takeoff' for Mumbai to be held from 1st February | औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत होणार वाढ; ५ फेब्रुवारीपासून होणार मुंबईसाठी ‘इंडिगो’चे ‘टेकऑफ ’

औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीत होणार वाढ; ५ फेब्रुवारीपासून होणार मुंबईसाठी ‘इंडिगो’चे ‘टेकऑफ ’

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक महिन्यांची मागणी पूर्णत्वास

औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बहुप्रतीक्षित ‘इंडिगो’ची ५ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईसाठी सकाळच्या वेळेत या कंपनीकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. मुंबईसह दिल्ली आणि हैदराबादसाठीही इंडिगोकडून विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे. 

एअर इंडिया, ट्रूजेट आणि स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’कडूनही औरंगाबादहून नवीन विमान सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विमानतळावर आवश्यक कस्टमर सर्व्हिस, सुरक्षा, रॅम्प पोझिशन यासह ग्राऊंड स्टाफ आदी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रियाही पार पडली.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे क ाम हाती घेण्यात आले. त्यामुळे शहरातून ‘इंडिगो’च्या ‘टेकआॅफ ’ होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते; परंतु गेल्या ५ महिन्यांपासून या कंपनीची विमानसेवा कधी आणि कोणत्या शहरासाठी सुरू केली जाणार, याकडे प्रवाशांचे डोळे लागले होते. अखेर ५ फेब्रुवारीपासून ही कंपनी औरंगाबादहून झेपावणार आहे. औरंगाबादहून नव्या विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या तयार आहेत. मात्र, मुंबई विमानतळाकडून स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळत नसल्याची बाब समोर आली होती. तेव्हा उद्योजक सुनीत कोठारी यांनी ‘एमआयएएल’चे सीईओ राजीव जैन, स्लॉट आणि डाटा मॅनेजमेंटचे सहायक व्यवस्थापक तन्वीर मौलवी यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवेसाठी विमान कंपन्यांना स्लॉट देण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा या मार्गासाठी स्लॉट देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले. या मार्गावरील विमानसेवेसाठी अर्ज येताच त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे राजीव जैन यांनी सांगितले होते. उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मुंबई विमानसेवेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

१८० आसनी विमान
इंडिगोकडून तिन्ही मार्गांवर १८० आसनी विमानाद्वारे विमानसेवा सुरू केली जाणार आहे. चिकलठाणा विमानतळावरून जेट एअरवेजची सकाळी आणि सायंकाळी मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा सुरू होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ही विमानसेवा बंद झाली. त्यानंतर मुंबईसाठी केवळ एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार होता. त्यानंतर एअर इंडियाने गत महिन्यात १६ आॅक्टोबरपासून आठवड्यातील तीन दिवसांसाठी मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा सुरूकेली. त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी आठवड्यात तीन दिवसांसाठी वाढली आहे; परंतु मुंबईसाठी सकाळच्या वेळेत किमान एक विमानसेवेची मागणी होत होती. अखेर इंडिगोच्या माध्यमातून ही मागणी पूर्णत्वास जात आहे.

असे आहे इंडिगोचे वेळापत्रक
मुंबई-औरंगाबाद 
मुंबईहून सकाळी ६.२५ वाजता उड्डाण आणि ७.२५ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-मुंबई
औरंगाबादहून सकाळी ८.२० वाजता उड्डाण आणि मुंबईत ९.१५ वाजता दाखल.

दिल्ली-औरंगाबाद
दिल्लीहून दुपारी २.०५ वाजता उड्डाण आणि दुपारी ४ वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-दिल्ली
औरंगाबादहून सायंकाळी ४.५५ वाजता उड्डाण आणि दिल्लीत सायंकाळी ६.४० वाजता दाखल.

हैदराबाद-औरंगाबाद 
हैदराबादहून सकाळी ११ वाजता उड्डाण आणि दुपारी १२.१० वाजता औरंगाबादेत आगमन.

औरंगाबाद-हैदराबाद
औरंगाबादहून दुपारी १२.४० वाजता उड्डाण आणि हैदराबादेत दुपारी १.४५ वाजता दाखल.


सर्वांच्या प्रयत्नांना यश
इंडिगोकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. या कंपनीकडे ६ महिन्यांपासून पाठपुरावा केला जात होता. अखेर त्याला यश मिळाले. हे सगळ्यांचे यश आहे. आता औरंगाबादहून पुणे, नागपूरसह जयपूरसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.     - सुनीत कोठारी, उद्योजक

आंतरराष्ट्रीय सेवेसाठी प्रयत्न
इंडिगोकडून मुंबई, दिल्ली आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यासाठी बुकिंगदेखील सुरू झाली आहे. यामुळे देशांतर्गत विमानसेवेत वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीही प्रयत्न केला जात आहे.
- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ
 

Web Title: Aurangabad connectivity will increase; IndiGo 'Takeoff' for Mumbai to be held from 1st February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.