औरंगाबाद बनतेय गर्भलिंग निदान, अवैध गर्भपाताचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 08:33 PM2019-02-11T20:33:27+5:302019-02-11T20:35:54+5:30
३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.
- ऋचिका पालोदकर
औरंगाबाद : गरिबांना म्हातारपणाचा आधार म्हणून, तर श्रीमंतांना करोडोंची इस्टेट सांभाळण्यासाठी वारसदार म्हणून वंशाचा दिवा पाहिजेच आहे. त्यामुळे पोटात वाढणारा गर्भ मुलीचा आहे की मुलाचा हे जाणून घेण्यासाठी आणि स्त्रीभू्रणहत्या करण्यासाठी मुंबईतील हाय प्रोफाईल लोक थेट औरंगाबादकडे धाव घेत आहेत. मुंबईकर आणि मराठवाड्यातील लोकांसाठी आता गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे केंद्र म्हणून औरंगाबाद शहर ओळखले जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबईतील सचिवालयापासून ते आएएस, आयपीएस अधिकारी, राजकीय नेते यांनी या कामासाठी खास जनसंपर्क अधिकारी नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे अवैध धंदे करणाऱ्या डॉक्टरांशी संधान साधले जाते आणि महिलांना विमानाने थेट औरंगाबादला पाठवले जाते. ३० हजार रुपयात गर्भलिंग निदान करणे, तर ४० हजार रुपयांत गर्भपात करणे, असे एकूण ७० हजारांचे ‘पॅकेज’ औरंगाबादेत दिले जाते.
याबाबतीत पुन्हा एकदा बीड जिल्ह्याने आघाडी घेतली असून, तेथे पूर्वी ५०० रुपयांत हे काम व्हायचे, आता त्यासाठी २० हजार रुपये मोजले जातात; पण बीडच्या तुलनेत औरंगाबादला येणे अधिक सोयीस्कर ठरत असल्यामुळे याकामी मुंबईतील लोकांची पहिली पसंती औरंगाबादला मिळत आहे. औरंगाबादपेक्षा तुलनेने दर कमी असल्यामुळे गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपातासाठी देशभरातून सुरतला जाणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणांहून सर्वाधिक लोक सुरतला जातात.
तपासणीकडे दुर्लक्ष
दर तीन महिन्यांनी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, तपासणीत सातत्य नसल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी आरोग्य मोहिमांचे कारण अधिकाऱ्यांकडून पुढे केले जाते. त्यामुळे अनधिकृत गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्यांना बळ मिळत आहे.
गर्भलिंग निदानासाठी पर्यटन
बँकॉक, मलेशिया, सिंगापूर याठिकाणी जाऊन गर्भलिंग निदान करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा प्रकारची कृत्ये करण्यासाठी आता नवीनच पर्यटनसंस्कृती रुजते आहे. या देशांमध्ये गर्भलिंग निदान सहज होत असल्यामुळे त्याठिकाणी जाऊन मुलगा आहे की मुलगी हे तपासून यायचे आणि मुलीचा गर्भ असल्यास भारतात येऊन गर्भपात करायचा, असा फंडा ‘हाय प्रोफाईल’ लोकांमध्ये प्रचलित असून, याचे स्तोम दिवसेंदिवस वाढते आहे; पण एका तिकिटाच्या खर्चात औरंगाबादला सर्वच गोष्टी होत असल्यामुळे बँकॉक , मलेशियापेक्षा औरंगाबादला पसंती देणाऱ्यांचे प्रमाणही सर्वाधिक आहे.
कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे
गर्भलिंग निदान आणि गर्भपात याबाबतीत मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड अग्रेसर आहे. यामध्ये गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित असा भेदभाव मुळीच नाही. सर्वसामान्यांप्रमाणे श्रीमंत आणि गर्भश्रीमंत लोकही याबाबतील अग्रेसर आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या ओळी नुसत्या कागदावरच असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे सगळे फावते. मुली वाचविण्यासाठी राजकीय लोकांनी पुढाकार घेऊन गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात मुलींच्या सुरक्षेसाठीचा अजेंडा लावून धरला पाहिजे. स्त्रीविषयक भूमिका मांडली पाहिजे.
- अॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या