औरंगाबादकरांनी घेतली दंडाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:06 AM2018-06-25T00:06:22+5:302018-06-25T00:07:02+5:30
कॅरिबॅग दिसली की, ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या कारवाईच्या भीतीने घरातील कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कॅरिबॅग दिसली की, ५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल. या कारवाईच्या भीतीने घरातील कापडी पिशव्या बाहेर निघाल्या आहेत. रविवारी बाजारपेठेत आलेल्या बहुतांश ग्राहकांच्या हातात पिशव्या दिसून आल्या. दुकानदार कॅरिबॅग देत नसल्याने अनेकांनी नवीन पिशव्या खरेदी केल्या.
राज्यभरातील महानगरपालिकेने शनिवारपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू करीत अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, सुस्त औरंगाबाद मनपाने सोमवारपासून कारवाईचा निर्णय घेतला; पण औरंगाबादकरांनी दंडात्मक कारवाईच्या भीतीने का होईना घरात ठेवलेल्या कापडी पिशव्या बाहेर काढल्या. रविवारचा दिवस असल्याने आज बाजारपेठेत ग्राहकांची नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी गर्दी अधिक होती. ६५ ते ७० टक्के ग्राहकांच्या हातात कापडी, वायरच्या पिशव्या दिसून आल्या. गुलमंडीवरील किराणा दुकानदार ओमप्रकाश ओसवाल यांनी सांगितले की, आम्ही शेंगदाणे, साखर, तांदूळ, साबुदाणा सर्व कागदी पुड्यांमध्ये बांधून देत आहोत. ३० वर्षांपूर्वी आम्ही कागदातच किराणा बांधून देत होतो. पुन्हा आता ते दिवस आले. लोकही स्वीकारत आहेत. औरंगपुरा भाजीमंडीतील सागर पुंड या विक्रेत्याने सांगितले की, आज बहुतांश ग्राहकांनी सोबत कापडी पिशव्या आणल्या होत्या. काही ग्राहकांनीच पिशव्या आणल्या नव्हत्या. त्यांनी वायरच्या पिशव्या खरेदी करून भाज्या घेतल्या. फरसाण विक्रेते पंकज अग्रवाल म्हणाले की, आम्ही फरसाण कागदात बांधून देत आहोत.
गुलाबजामून, जिलेबी, रसगुल्ला यासारखे पाकाचे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांनी स्वत:हून डबे आणले होते. यामुळे आम्हाला प्लास्टिक बंदीची माहिती देण्याची गरज पडली
नाही.
रविवारच्या बाजारातही फरक जाणवला
रविवारच्या आठवडी बाजारात बहुतांश भाजी विक्रेत्यांनी कॅरिबॅग देणे बंद केले होते. अनेक ग्राहक पिशव्या घेऊनच आठवडी बाजारात आले होते. भाजी विक्रेते चंदन दारकोंडे म्हणाले की, पूर्वी प्रत्येक फळभाजीसाठी स्वतंत्र कॅरिबॅग द्यावी लागत असे. आज मात्र ग्राहक एकाच पिशवीत गवार, भेंडी, मिरची, बटाटे, लसूण एकत्र नेत होते. काही विक्रेते प्लास्टिकच्या किराणा बॅगमध्ये फुटाणे, खारे शेंगदाणा विकताना दिसले. गांधीनगर रस्त्यावर हातगाडीवरून फळ विकणारेही पपई, अननस कागदात गुंडाळून देत होते. पिशव्या विक्रेते, मेहमूदभाई यांनी सांगितले की, जेथे ६० ते ७० पिशव्या विकल्या जात, तेथे आज दिवसभरात १४२ पिशव्या विकल्या.
दुसऱ्या दिवशीही कारवाई शून्यच
राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरूझाली आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, औरंगाबाद महानगरपालिकेने दुसºया दिवशी एकही कारवाई केली नाही. महानगरपालिकेच्या घनकचरा पथकातील दोन अधिकाºयांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांना सोमवारपासून कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यामुळे प्लास्टिक विक्रेतेही आज बिनधास्त दिसून आले.
काही प्लास्टिक विक्रेत्यांनी दुकानातील किराणा बॅग, प्लास्टिकच्या अन्य बॅगांचे पॅकिंग करून ठेवणे सुरू केले होते, तर काहींनी दुकानातील प्लास्टिक पिशव्या गोदामात नेऊन ठेवल्या. अनेक विक्रेत्यांच्या दुकानांवर तुरळक खाकी कापडी पाकिटे दिसली. ५० ग्रॅम ते किलोपर्यंत किराणा सामान मावेल, एवढ्या आकारातील ही कागदी पाकिटे होती. मात्र, शहरवासी स्वत:हून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना दिसून आले.