लुटमार करणार्या तेलंगणा टोळीतील दोघांना औरंगाबाद गुन्हे शाखेने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 06:03 PM2017-12-20T18:03:24+5:302017-12-20T18:08:16+5:30
३० हजाराच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा देण्याची बतावणी करून लुटमार करणार्या तेलंगणा टोळीतील दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून पकडले.
औरंगाबाद: ३० हजाराच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा देण्याची बतावणी करून लुटमार करणार्या तेलंगणा टोळीतील दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून पकडले. या आरोपींकडून ३० हजार रुपये, एक धारदार कटणी(सुरा)जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री महावीर चौक उड्डाणपुलावर करण्यात आली.
सय्यद गौस सय्यद मकदूम(५९,रा. आरसापल्ली, निजामाबाद) आणि शेख हैदर शेख कादर(३६,रा. बोधन, जि. निजामाबाद, तेलंगणा)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या टोळीने ३० हजाराच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा देण्याचे सांगून लुटमार केली आहे. या टोळीविरोधात विविध ठिकाणी गुन्हे आहेत. टोळीतील दोन जणांनी शहरातील एका तरूणाशी (पोलिसांचा खबरी) संपर्क साधून ३० हजाराच्या बदल्यात बनावट नोटा देण्याची तयारी दर्शविली. बनावट नोटा म्हणजे देशाशी गद्दारी करणार्या या आरोपींची माहिती खब-याने गुन्हेशाखेला दिली. यानंतर बनावट नोटा घेऊन औरंगाबादेत येण्याचा निरोप पोलिसांनी खबर्यामार्फत आरोपींना दिला.
खबर्याच्या संपर्कात असलेले दोन जण मंगळवारी औरंगाबादेतील महावीर चौक उड्डाणपुलाखाली येणार असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, , पोहेकाँ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, लालखा पठाण, धर्मराज गायकवाड, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, नितीन धुळे यांनी सापळा रचला. रात्री उशीरा दोन्ही संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले. सय्यद गौसकडे विशिष्ट पद्धतीने तयार केलेला लाकडी बॉक्स मिळाला, या बॉक्स मध्ये दोन्ही बाजूंनी १०० रुपयांच्या नोटा आणि आतमध्ये जुन्या वर्तमानपत्राची रद्दी भरलेली दिसली. तर शेख हैदरच्या अंगझडतीत एक धारदार कटनी(कोयत्यासारखी) मिळाली. या आरोपींविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला