तलवारीची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:00 PM2018-06-12T17:00:22+5:302018-06-12T17:08:12+5:30

तलवारीची आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग पोर्टलला गुन्हे शाखेने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले.

Aurangabad Crime Branch Notices, to Flipkart, which is selling online swords | तलवारीची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या नोटिसा

तलवारीची ऑनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्टला औरंगाबाद गुन्हे शाखेच्या नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्दे नोटीस पाठवून आठ दिवस उलटले तरी फ्लिपकार्टचे अधिकारी अद्यापही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत.

औरंगाबाद : तलवारीची आॅनलाईन विक्री करणाऱ्या फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग पोर्टलला गुन्हे शाखेने नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले. नोटीस पाठवून आठ दिवस उलटले तरी फ्लिपकार्टचे अधिकारी अद्यापही गुन्हे शाखेसमोर हजर झाले नाहीत.

शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून मागविलेल्या तलवारी, चाकू, जांबिया अशी ४१ प्राणघातक शस्त्रे पोलिसांनी नुकतीच जप्त केली. या प्रकरणात गुन्हे शाखेने आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून, आरोपी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी क्रांतीचौक आणि मुकुंदवाडी ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला.

कोणत्याही प्रकारचे धारदार शस्त्र जवळ बाळगणे, विक्री करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असताना फ्लिपकार्टवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रथम कंपनीच्या संचालकांना नोटीस पाठवून जबाब देण्यासाठी गुन्हे शाखेत हजर होण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या नोटिसांना कंपनीने रजिस्टर्ड पोस्टाद्वारे उत्तर पाठवून दिले. कंपनीचे अधिकारी पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुन्हा त्यांच्याविरोधात अधिक पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. शोभेची शस्त्रे विक्री करण्याचा कंपनीला अधिकार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 
मात्र, कंपनीने वेबसाईटवरून विक्री केलेली आणि प्रत्यक्षात ग्राहकांना मिळालेली ही शस्त्रे धारदार असून शोभेची नाहीत. या शस्त्रांमुळे कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी फ्लिपकार्ट आणि इन्स्टाकार्ट कंपनीच्या संबंधितांविरुद्ध कारवाईची तयारी सुरू केली.

मंत्रालयात बैठक
गुन्हे शाखेचे अधिकारी आपल्याविरुद्ध अधिक पुरावे जमा करीत असल्याचे कळताच   कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणात लक्ष घालण्याचे सांगितले. त्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची फाईल घेऊन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले होते. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात जाऊन औरंगाबाद पोलिसांची कारवाई योग्य असल्याचे अधिकाऱ्यांना पटवून दिले. 

Web Title: Aurangabad Crime Branch Notices, to Flipkart, which is selling online swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.