तहसीलदारांना अंधारात ठेवून औरंगाबाद गुन्हे शाखेकडून गुप्तधन जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:12 PM2018-02-02T13:12:23+5:302018-02-02T13:14:25+5:30
गुप्तधन सापडल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभागाला देऊन तहसीलदारांच्या ताब्यात गुप्तधन देणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे असताना शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाने मात्र महसूल विभागाला अंधारात ठेवून काही लोकांकडून गुप्तधन जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
औरंगाबाद : गुप्तधन सापडल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभागाला देऊन तहसीलदारांच्या ताब्यात गुप्तधन देणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, असे असताना शहर गुन्हे शाखेच्या एका पथकाने मात्र महसूल विभागाला अंधारात ठेवून काही लोकांकडून गुप्तधन जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सिद्धार्थ उद्यानासमोरील कामगार कल्याण मंडळासमोर ३१ जानेवारी रोजी आलेल्या दिगंबर अर्जुन वाघमारे आणि बाबासाहेब वामन शिंदे (दोघे रा. रांजणगाव शे.) यांना गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे आणि पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पिवळ्या धातूची दोन नाणी मिळाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील नारळा डोणगाव येथील भागीनाथ थोरात यांच्या शेतात गुप्तधन असल्याचे समजले होते. त्यानंतर अर्जुन वाघमारे, दिगंबर वाघमारे, बाबासाहेब शिंदे, प्रकाश चव्हाण, संजय कचरू शेळके, हरिदास चंद्रभान गवळी, दिगंबर चंद्रभान गवळी, धोंडिबा खंदारे आणि तीन बाबा यांनी २७ जानेवारी रोजी थोरात यांच्या शेतात खोदकाम केले. तेथे त्यांना गुप्तधनाचा हंडा मिळाला. या हंड्यातील धन सर्वांनी समान वाटून घेतल्याचे वाघमारे यांनी पोलिसांना सांगितले. शिवाय काही नाणी ज्ञानेश्वर त्रिंबक सोनवणे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती मिळताच पोलिसांनी या सर्वांकडून खोदकामात मिळालेली पिवळी हंडी, पितळी कमंडलू (१ किलो ७३१ गॅ्रम), कथिल शिक्के (९४९ ग्रॅम), पितळी धातूचे नाणे (२ किलो ५९३ ग्रॅम) जप्त केले. जप्त नाण्यांची सोनाराकडून तपासणी केली असता ते सोन्याचे नसल्याचा अभिप्राय त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन अनोळखी भोंदूबाबांनी सात जणांकडून एक लाख रुपये घेऊन हे गुप्तधन काढून दिल्याचा जबाब नोंदविला. मात्र या प्र्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गंगापूर तहसीलदारांना पंचनाम्यासाठी पाचारण केले नाही.
पोलिसांनी कळविले नाही
पोलिसांना कारवाई करता येते, मात्र गुप्तधन जप्त करताना महसूल अधिकार्यासमोर पंचनामा करावा लागतो. गंगापूर तालुक्यातील गुप्तधन जप्त करताना गुन्हे शाखा पोलिसांनी मला कळविले नाही. शिवाय या गुप्तधनाची माहिती पुरातत्व विभागाला देणे पोलिसांना बंधनकारक आहे.
- चंद्रकांत शेळके, तहसीलदार, गंगापूर