दिल्ली-मुंबईला मागे टाकत औरंगाबादचा सायकल ट्रॅक देशभरातील १५ शहरांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:37 PM2021-07-31T18:37:29+5:302021-07-31T18:43:24+5:30
औरंगाबाद शहराने सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंत शहरातील पहिला सायकल ट्रॅक विकसित केला.
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीज् मिशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’ या स्पर्धेत देशभरातील १५ शहरांमध्ये औरंगाबादने स्थान मिळवले. या स्पर्धेच्या परीक्षकांनी औरंगाबादचा विशेष उल्लेख केला. औरंगाबादने मुंबई, दिल्ली, चेन्नई, इंदूर या बड्या शहरांना ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’मध्ये मागे टाकले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्मार्ट सिटी मिशनने ‘सायकल फॉर चेंज चॅलेंज’ सुरु केले. स्मार्ट सिटी मिशनमार्फत विविध शहरांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ११७ शहरांची नोंदणी केली होती. या शहरांनी कमीतकमी एक सायकल ट्रॅक प्रायोगिक तत्वावर तयार करण्याचे उद्दिष्ट होते.
औरंगाबाद शहराने सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंत शहरातील पहिला सायकल ट्रॅक विकसित केला. क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या मार्गावरील सायकल ट्रॅकचा विशेष उल्लेख सायकल फॉर चेंज चॅलेंज या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत परीक्षकांनी केला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शहरांपैकी पहिल्या पंधरा शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या यशाबद्दल पालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी समाधान व्यक्त केले. शहरात २० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. देशपातळीवर औरंगाबादचा विशेष उल्लेख केला, ही शहरासाठी भूषणावह बाब आहे. अजून बरेच काम बाकी आहे, नियोजनानुसार ते केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.