औरंगाबाद जिल्ह्यात २४५ मंदिरांकडे आहे ५ हजार एकर इनामी जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:58 AM2018-06-20T11:58:39+5:302018-06-20T11:59:55+5:30
जिल्ह्यात जुन्या आणि प्राचीन अशा २४५ मंदिरांची धर्मादाय सहआयुक्तालयात नोंदणी आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : अनेक वर्षांत मंदिरांचा आर्थिक हिशेब तसेच संपत्तीचे विवरण व मालमत्तेची कागदपत्रे सादर न करणाऱ्या मंदिरांच्या विश्वस्तांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा धर्मादाय सहआयुक्तांनी दिला आहे. जिल्ह्यात जुन्या आणि प्राचीन अशा २४५ मंदिरांची धर्मादाय सहआयुक्तालयात नोंदणी आहे. या मंदिरांना इनामस्वरूपात एकूण ५,०५४ एकर जमीन मिळाली आहे.
नोंदणीकृत सहा मंदिरांकडे १०० ते ३०० एकरदरम्यान शेतजमीन आहे. १८६ मंदिरांचे विश्वस्त असे आहेत की, त्यांनी मागील अनेक वर्षांपासून हिशेब आणि कागदपत्रे सादर केलेली नाहीत. वर्षानुवर्षे हिशोब सादर न करणाऱ्या सुमारे ७ हजार संस्थांची नोंदणी धर्मादाय सहआयुक्तांनी यापूर्वीच रद्द केली आहे. आता या विभागाने आपला मोर्चा जिल्ह्यातील मंदिर न्यासाकडे वळविला आहे. जिल्ह्यात लहान-मोठी हजारो मंदिर आहेत. त्यापैकी २४५ मंदिर न्यासांची नोंदणी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या अंतर्गत धर्मादाय सहआयुक्तालयात करण्यात आली आहे.
मंदिराचा वार्षिक खर्च भागविण्यासाठी तत्कालीन राजे, महाराजांनी इनामी जमिनी दिल्या. मंदिरांना इनाम म्हणून मिळालेल्या जमिनी अस्तित्वात आहेत, की या जमिनींची परस्पर विक्री झाली, या जमिनींची कागदपत्रे विश्वस्तांकडे आहेत का, विश्वस्त हयात आहेत की नाहीत, यासंबंधीची सर्व माहिती आता धर्मादाय सहआयुक्तांना द्यावी लागणार आहे. यासंदर्भात तसे आदेश धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी जारी केले आहेत. त्यानुसार हिशोब आणि कागदपत्रे सादर न केलेल्या मंदिरांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येत आहेत. यासंबंधीची सर्व चौकशी सहायक धर्मादाय आयुक्त व उपआयुक्त करणार आहेत. या चौकशीतून मंदिरांचा कारभार पारदर्शक होणे, मंदिरांच्या शेतजमिनी कायम ठेवणे व देणगीचा योग्य विनियोग होणे यासंबंधीची शिस्त लागणार आहे. मंदिरांच्या संपत्तीची भाविकांना माहिती होणे हादेखील यामागचा हेतू आहे.
परवानगीशिवाय विकता येणार नाही जमीन
सार्वजनिक विश्वस्त अधिनियमनअंतर्गत मंदिर विश्वस्तांना मंदिराची शेतजमीन व संपत्ती धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही. तसेच मंदिराची शेतजमीन किंवा इमारत कायद्यात दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक काळ भाड्याने देता येणार नाही. या आदेशाचे पत्र तहसीलदार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
मंदिराच्या इनामी जमिनी
एकर मंदिरांची संख्या
१०० एकरपेक्षा अधिक ६
५० ते १०० एकरदरम्यान १३
२५ ते ५० एकरदरम्यान १६
१ ते २५ एकरदरम्यान २१०