औरंगाबाद जिल्हा परिषदेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:50 AM2019-05-24T00:50:48+5:302019-05-24T00:51:09+5:30
संपूर्ण जिल्ह्याला निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारीही मागे नव्हते. गुुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता.
औरंगाबाद : मतमोजणीला सकाळपासूनच सुरुवात झाली. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचा गड राखतील की बहुजन वंचित आघाडीचे इम्तियाज जलील, हर्षवर्धन जाधव बाजी मारतील, संपूर्ण जिल्ह्याला निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारीही मागे नव्हते. गुुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट होता. कामाला दांडी मारून टीव्हीसमोर अधिकारी- कर्मचारी कोणी घरात बसून टीव्हीवर, तर कोणी मोबाईलवर निकालाचा प्रत्येक ‘अपडेट’ पाहण्यात मग्न होते.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत झाल्याने कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. मतमोजणीची एक फेरी संपली की दुसरी कधी सुरू होते आणि त्या फेरीत कोण आघाडी घेतो आणि कोण पिछाडीवर जातो, ही जाणून घेण्याची उत्सुकता कर्मचारी- अधिकाऱ्यांमध्ये दिसून आली. एरव्ही मोठी वर्दळ असलेल्या जिल्हा परिषदेत आज सुटी असल्याचा माहोल दिसत होता.
निकालाबरोबर आज उन्हाची तीव्रताही अधिक होती. त्याचाही परिणाम जाणवत होता. १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. तेव्हापासून जिल्हा परिषदेतील वर्दळ कमी होत गेली. बहुतेक सर्वच जण मोबाईलवरून आपल्या सहकाऱ्यांकडून निकाल जाणून घेत होते व ऐकलेल्या निकालावर अमुक उमेदवार मागे का पडला, आघाडी घेतलेल्या उमेदवाराला कोणाचा फायदा झाला, असा कयास लावण्यातही हे कर्मचारी-अधिकारी मागे नव्हते.