औरंगाबाद जिल्हा न्यायालयातील वकिलांचा सोमवारी कामकाजावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:14 AM2018-02-03T00:14:10+5:302018-02-03T00:14:14+5:30
राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या न्यायालयीन शुल्कवाढीच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतला असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे.
औरंगाबाद : राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या न्यायालयीन शुल्कवाढीच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय वकील संघाने घेतला असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे. यासंदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संजय भिंगारदेव आणि सचिव अॅड. सुदेश शिरसाठ यांनी सांगितले की, महाराष्टÑ शासनाने १६ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयीन शुल्कात वाढ केली व याबाबतचा आदेश जारी केला आहे. ही शुल्कवाढ अन्यायकारक असल्यामुळे वकील संघाने याचा निषेध केला आहे. सोमवारी (दि.५ फेब्रुवारी) जिल्हा न्यायालयातील वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचा ठराव वकील संघाच्या कार्यकारिणीने बैठकीत मंजूर केला आहे. शिरसाठ म्हणाले की, शुल्कवाढीचा भार पक्षकार आणि वकिलांना सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. मात्र, पक्षकार आणि वकिलांच्या विरोधाची शासनाला जाणीव व्हावी यासाठी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.