नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्याला मिळाला १४३ कोटी ७ लाख रुपयांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 06:18 PM2020-11-14T18:18:15+5:302020-11-14T18:19:40+5:30
दिवाळीआधीच हा निधी जाहीर झाला आहे.
सोयगाव : शासनाकडून अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १४३ कोटी सात लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी प्राप्त झाला. जिल्ह्यातील तहसीलनिहाय निधी वर्ग करण्याची प्रक्रिया बुधवारी दिवसभर सुरू होती. दिवाळीआधीच हा निधी जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र, तसेच जिरायती व आश्वासित सिंचनाखाली नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार प्रतिहेक्टरप्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुज्ञेय आहे. या निधीच्या वितरणासाठी तातडीने बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या याप्रमाणे यादी तयार करण्याचे काम सोयगाव तहसील कार्यालयात हाती घेण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा
सोयगावचा पहिल्या टप्प्यातील ५० टक्के निधी कपात करण्यात आला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मदती मिळाली; पण ...
खरीप हंगामाच्या प्रारंभी दमदार पाऊस पडल्याने चांगल्या उत्पन्नाची हमी होती. तसे पीक पण आले होते. मात्र अतिवृष्टीमुळे सर्व होत्याचे नव्हते झाले. शासनाकडून तालुका पातळीपर्यत नुकसानीची मदत मिळाली असली तरी ती अद्यापही हातात नाही. ती किती मिळेल माहीत नाही. मात्र नुकसान त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक झाले आहे.
- सोपान पाटील, सोयगाव
प्रतिहेक्टरी मदत
जिराईतसाठी १००००
बागायतीसाठी २५०००
जिल्ह्यात तहसीलनिहाय मिळालेला पहिल्या टप्प्यातील निधी
तहसील कार्यालय निधीची रक्कम
औरंगाबाद २८८१६४६००
पैठण ३७२५२८०००
फुलंब्री १०६३२८००
गंगापूर २७२८६२२५०
वैजापूर ३३९१४१२००
खुलताबाद ५२०३०६७२
कन्नड ८६५०८८००
सिल्लोड १८२४४२७८
सोयगाव ४३०३५००
अपर तहसील औ.बाद ३६३८१९००