औरंगाबाद जिल्ह्यात दररोज २५१ वाहनांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 08:13 PM2019-06-05T20:13:20+5:302019-06-05T20:15:11+5:30
वाहनसंख्या पोहोंचली १३ लाखांवर
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाहनांची संख्या तब्बल १३ लाख ७९ हजारांवर पोहोचली आहे. महिन्याला सुमारे आठ हजार तर दररोज जवळपास २५१ नव्या वाहनांची भर पडत आहे. जुन्या आणि भंगार वाहनांनी प्रदूषणाला हातभार लागत असून, शुद्ध हवा आणि स्वच्छ वातावरण अशी औरंगाबादची ओळख नाहीशी होत आहे.
शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये दुचाकींची संख्या १० लाखांवर आहे. वाहनांमधून कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पीयूसी तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांतून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा ‘पीयूसी’चा उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात पीयूसी केवळ दंड वाचविण्यासाठीचे साधन झाले आहे. ते देणाऱ्या यंत्रणेकडून गांभीर्याने तपासणी होत नाही. शिवाय जिल्ह्यात दुचाकींची संख्या अधिक आहे. दुचाकींनाही दरवर्षी पीयूसी तपासणी बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.
महिन्याला ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवर
जिल्ह्यात दर महिन्याला सुमारे ७ ते ८ हजार नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत. वर्षाला एक लाख वाहनांची भर पडत आहे. २०१० मध्ये जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार होती. अवघ्या ९ वर्षांत वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजारांवर गेली आहे.
५४९ इलेक्ट्रिक दुचाकी
जिल्ह्यात ५८५ इलेक्ट्रिक वाहने आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या ५४९ इतकी आहे. उर्वरित वाहने ही कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करणारी आहेत. वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात त्यांची संख्या तोकडीच आहे. त्याशिवाय एकच सीएनजी वाहन आहे.
फक्त ३६ सिटी बस
शहरात आजघडीला केवळ ३६ स्मार्ट सिटी बस धावत आहे. शहराच्या तुलनेत त्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी, दुचाकी वाहन वापरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यातूनच वाहनांची संख्या वाढत आहे आणि वायू प्रदूषणाला हातभार लागत आहे.
मानकांप्रमाणे हवे वायूंचे प्रमाण
वाहनांसाठी दिलेल्या मानकांप्रमाणे वायूंचे प्रमाण पाहिजे. त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर त्या वाहनाला पीयूसी प्रमाणपत्र दिले जात नाही. बीएस-३ वाहनांना सहा महिन्याला हे प्रमाणपत्र घ्यावे लागते, तर बीएस-४ वाहनांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील परिस्थिती
एकूण वाहनांची संख्या १३ लाख ७९ हजार ४६२
दुचाकी १० लाख ८६ हजार ५२९
रिक्षा ३४ हजार ७२७
मोटार कार ८२ हजार ४७९
जीप २९ हजार ३२२
ट्रक १५ हजार ८८३
टँकर ४ हजार ७८१
ट्रॅक्टर २९ हजार ३७६
रुग्णवाहिका ५३८
मिनी बस २ हजार १७९
स्कूल बस १ हजार १२५
असे हवे वायूचे प्रमाण
- पेट्रोल वाहन
कार्बन मोनोक्साईडची कमाल मर्यादा ३.५ %.
हायड्रोकार्बनची कमाल मर्यादा ४५०० पीपीएम (पर पार्ट मिलियन)
- डिझेल वाहन
काळ्या धुराचे प्रमाण- २.४५