औरंगाबाद जिल्ह्यात ५० हजार नागरिक दातांविना; उपचारासाठी खाजगी संस्थांचे पाठबळ मिळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:48 PM2019-02-06T12:48:56+5:302019-02-06T13:35:50+5:30
तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : मानवाच्या मुखात दात नसतील, तर काहीही फरक पडत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे; परंतु दात नसल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयोमानानुसार दात दुखतात, अनेकदा ते हलून पडून जातात. अशावेळी कृत्रिम दात, कवळी बसविण्याचा सल्ला दिला जातो. औरंगाबाद जिल्ह्यात ५० ते ८० वर्षे वयोगटातील तब्बल ५० हजार नागरिक दातांविना असल्याची माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
५ फेब्रुवारी हा दिवस मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे ५ ते १२ फेब्रुवारी दरमऱ्यान मौखिक आरोग्य सप्ताह साजरा के ला जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जिल्हाभरात शिबिरे घेण्यात येतात. पथनाट्य, कलापथक, कीर्तनाच्या माध्यमातून मौखिक आरोग्याची जनजागृती केली जात आहे.
डॉ. एस.पी. डांगे म्हणाले की, तोंडात काही विकार असेल, तर शरीरप्रकृतीत त्याचे प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी मुख आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गतवर्षी रुग्णसेवेबद्दल राज्य शासनाचा सुश्रुत पुरस्कार मिळाला. रुग्णालयातील डेंटल व्हॅन आणि डॉक्टरांचे पथक संपूर्ण राज्यात विशेषत: ग्रामीण भागांत मौखिक आरोग्यांची सेवा देतात. यामध्ये दातांना कीड काढणे, चांदी भरणे, कवळी बसविणे आणि इतर उपचार केले जातात. सगळ्या तपासणीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५० हजार रुग्ण कवळीविना, दंतविहीन आढळले आहेत. अशा रुग्णांना आहार घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातून शरीरावरही परिणाम होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
खाजगीत दहा हजारांवर खर्च
ग्रामीण भागांमध्ये दातांची निगा, स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्रामीण मौखिक विकाराचे प्रमाण अधिक आढळते. कवळीसाठी खाजगीत दहा हजार रुपयांवर खर्च येतो. ग्रामीण भागातील रुग्णांना ते परवडणारे नसते. त्यामुळे शासकीय दंत महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्यांचा ओघ अधिक आहे. खाजगी रुग्णालयात उपचार करतानाही शासकीय योजनेचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे दंततज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उपचारासाठी प्राधान्य
जिल्ह्यातील दंत, कवळीविना असलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचारासाठी रुग्णालयात बोलाविण्यात आले आहे. रुग्णालयात आतापर्यंत शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत; परंतु अनेक जण अद्यापही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ‘पीपीपी’ तत्त्वावर खाजगी संस्थांनी येऊन आर्थिक पाठबळ दिले, तर खाजगी दंत रुग्णालयात जाऊन रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- डॉ. एस.पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय
पहा व्हिडिओ :