औरंगाबाद जिल्ह्यात अस्मिता योजनेत नोंदणी २३,००० ची मात्र लाभार्थी फक्त ७,०००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:43 PM2018-09-12T15:43:54+5:302018-09-12T15:45:05+5:30
यातर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील २३,००० मुलींची नावनोंदणी झाली असून, अद्याप ७,००० मुलींनाच अस्मिता कार्ड मिळाले आहे.
औरंगाबाद : जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वर्षे या वयोगटातील मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता दि. ८ मार्चपासून राज्यात अस्मिता योजनेचा शुभारंभ झाला. यातर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील जि. प. शाळांमधील २३,००० मुलींची नावनोंदणी झाली असून, अद्याप ७,००० मुलींनाच अस्मिता कार्ड मिळाले आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थिनींना पाच रुपयांत ८ नॅपकिन्स मिळणार आहेत.
या योजनेंतर्गत मुलींची शाळानिहाय यादी तयार करून ती शासनाकडे पाठविण्यात आली होती. नोंदणी झालेल्या सर्व मुलींना अस्मिता कार्डचे वाटप करण्यात येणार असून, हे कार्ड दाखवून मुली त्यांच्या भागात असणाºया स्वयंसाहाय्यता समूहांकडून अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन्स घेऊ शकतात; पण अजूनही बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये या कार्डचे वाटप झालेले नाही. काही शाळांमध्ये मोजकेच कार्ड आले असून, काही विद्यार्थिनींनाच त्याचा लाभ मिळाला.
उमेद अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसाहाय्यता समूहांमार्फत ही योजना राबविण्यात येत असल्यामुळे नॅपकिन्स घेण्यासाठी मुलींनी त्यांच्या भागातील स्वयंसाहाय्यता गटांना भेटणे आवश्यक आहे; परंतु आपल्या गावात असे समूह कोणते आहेत, याची विद्यार्थिनींना पुरेशी माहिती नसल्याने कार्ड घेऊनही उपयोग होत नसल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना २४ रुपयांत ८ नॅपकिन्स मिळतील.