औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीलाच प्राधान्य; मक्याचे पीकही यंदा बहरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 07:01 PM2018-06-06T19:01:29+5:302018-06-06T19:04:42+5:30
मान्सूनपूर्व पावसाने मागील आठवड्यात जोरदार सलामी दिली. त्यामुळे खरिपाची लगीनघाई सुरू झाली आहे.
औैरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने मागील आठवड्यात जोरदार सलामी दिली. त्यामुळे खरिपाची लगीनघाई सुरू झाली आहे. ७ जूनअगोदरच १० टक्के बियाणांची विक्री झाली आहे. यात ७ टक्के बियाणे बी.टी. कपाशीचे आहे. मागील वर्षी शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा १५ ते २० टक्क्यांनी कपाशीचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता; पण प्रत्यक्षात दुसऱ्या नगदी पिकांचा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांचा कपाशी बियाण्याकडेच कल दिसत असून, मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी कपाशी क्षेत्र घटेल, अशी शक्यता जिल्हा बियाणे विक्रेता संघटनेने व्यक्त केली आहे.
यंदा समाधानकारक पाऊस होणार, असे भाकीत हवामान विभागापासून ते ज्योतिषापर्यंत सर्वांनी वर्तविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. काही भागांत शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागती पूर्ण केल्या आहेत. कृषी बाजारपेठेचा विचार करता यंदा ४८ हजार ९६४ क्विंटल बियाणांची आवश्यकता लागणार आहे. कापूस पिकासाठी १८ लाख ८६ हजार बी.टी. बियाणांची पाकिटे, तर ३१ हजार क्विंटल मका बियाणे उपलब्ध झाले आहे. यासंदर्भात जिल्हा बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, २ जून रोजी जिल्ह्यात काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे बियाणांची मागणी वाढू लागली आहे.
मंगळवारपर्यंत १० टक्के बियाणे विक्री झाले. त्यातील ७ टक्के बियाणे बी.टी. बियाणे होते. उर्वरित ३ टक्के बियाणे मका, तूर, बाजरी आदी प्रकारचे आहे. मका दाणे भरण्याच्या वेळेस पावसाचा खंड पडत असल्याने मका उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. हे लक्षात घेऊन शेतकरी मागील वर्षीचा कटू अनुभव असतानाही यंदाही नगदी पीक म्हणून कपाशीचाच विचार करीत आहेत. यामुळे १५ ते २० टक्क्यांऐवजी ७ टक्केच क्षेत्र कपाशीचे कमी होईल, असे विक्रेता संघटनेचा अंदाज आहे.
३७० वाणांनाच परवानगी
केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत दिल्लीतील जेनेटिकल इंजिनिअरिंग अॅप्रूव्हल कमिटी (जीईएसी)मार्फत बीटी कापूस वाणांना मान्यता देण्यात येते. अशा प्रमाणित करून शिफारस केलेल्या ४२ मूळ उत्पादक कंपन्यांच्या ३७० वाणांना २०१८ खरीप हंगामासाठी राज्यात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षी एकच वाण वेगवेगळ्या नावाने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ५३ कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
बी.टी. बियाणे ६० रुपयांनी स्वस्त
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, मागील वर्षी ४५० ग्रॅमचे बी.टी. बियाणे प्रति पॉकीट ८०० रुपये दराने विकले. यंदा यात ६० रुपये कमी होऊन ७४० रुपये किंमत झाली आहे, तर मागील वर्षी २०० ते २५० रुपये प्रति किलोने विक्री होणारे तुरीचे बियाणे यंदा (विनाअनुदानित) १५० ते २०० रुपयांना विकत आहे. मका बियाण्यांचे भाव स्थिर असून प्रति ४ किलो बियाणे पिशवी ७०० ते १३०० रुपये, बाजरी ३०० ते ५०० रुपये प्रति दीड किलो आहे.
जिल्ह्यात अडीच हजार बियाणे विक्रेते
जिल्ह्यात कृषी विभागाने २५६९ विक्रेत्यांना बियाणे विक्रीची मान्यता दिली आहे. यात औैरंगाबाद ३१०, पैठण २९५, गंगापूर २९०,
वैजापूर ३७६, कन्नड ३५२, खुलताबाद १४९, सिल्लोड ४८२, सोयगाव ७३, तर फुलंब्री तालुक्यात २४२ बियाणे विक्रेत्यांचा समावेश आहे.
पिकाचे प्रस्तावित क्षेत्र व बियाणे मागणी
पीक प्रस्तावित क्षेत्र बियाणे मागणी
(लाख हेक्टर) (क्विं.)
कापूस ३.७७ ९४३२
मका १.९७ २९५६५
तूर ०.३७ १६६५
मूग ०.१६ ९६९
उडीद ०.०६ २१७
बाजरी ०.३९ १३५५
सोयाबीन ०.१४ ५११०
भुईमूग ०.०८ ४१७