औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाची छाया; प्रशासकीय यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 03:10 PM2018-10-30T15:10:54+5:302018-10-30T15:20:26+5:30
येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती जिल्ह्यात आहे
औरंगाबाद : जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाच्या छायेखाली आहेत. येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती असून, त्या अनुषंगाने यंत्रणेला सतर्क करण्यासाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांची उजळणी घेण्यात आली.
पुरवठा विभाग, कृषी विभाग, घरकुल योजना विभाग, रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आजवरची प्रगती आणि येणाऱ्या सहा महिन्यांत करावयाची कामे, याबाबत संबंधित विभागांना डेडलाईन ठरवून देण्यात आली. घरकुल योजनेसाठी जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट ३७ टक्के पूर्ण झाले आहे. ६२ टक्के घरकुल योजनेची कामे अपूर्ण आहेत. खुलताबाद वगळता सर्व तालुक्यातील घरकुलांची कामे अपूर्ण पडलेली आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत रखडलेली कामे पूर्ण करावीत, यासाठी गृहनिर्माण अभियंते व अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
जलयुक्त शिवार योजनेतील ९३ टक्के गावांतील कामे पूर्ण झाल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीत केला. १५ डिसेंबरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळी बांधण्यात आली आहे. प्रत्येक कृषी सहायकावर येणाऱ्या काळात २० शेततळे बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यात ६५ हजार शेततळी होतील, असा दावा याप्रसंगी करण्यात आला.
अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची उजळणी केली जात असताना गंगापूरमधून आलेले शेतकरी कृषी अधीक्षकांचा सकाळपासून पाठपुरावा करीत होते. गायी घेण्यासाठी कृषी विभागाने लाभार्थ्यांसाठी ५० टक्के योजना कार्यान्वित केली. मुठ्ठेवडगाव येथील २४ शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून गायी खरेदी केल्या. त्या गायींचा विमा उतरविणे, त्यांची तपासणी करणे, कृषी विभागाकडे अहवाल सादर करण्यात प्रत्येकाचे ८ हजार खर्च झाले. ४० हजारांची एक गाय, अनुदान मिळणार २० हजारांचे त्यात सरकार यंत्रणेच्या खाबुगिरीत गेले ८ हजार रुपये, अशी परिस्थिती असताना तालुका कृषी अधीक्षकाने शेतकऱ्यांना औरंगाबादला पाठविले. औरंगाबाद कृषी अधीक्षकांनी आज दिवसभर शेतकऱ्यांना बैठकीमुळे फिरविले. अनुदानातील अर्धी रक्कम मिळण्यापूर्वीच खर्च झाल्याचे शेतकरी महेश खेडकर, कचरू खेडकर यांनी सांगितले.