औरंगाबाद जिल्ह्याची नजर आभाळाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:00 AM2018-07-04T01:00:03+5:302018-07-04T01:02:23+5:30
जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने कृपादृष्टी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाऐवजी अधूनमधून नुसती रिमझिम सुरू आहे. आकाशात ढग दाटून येतात; परंतु समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने कृपादृष्टी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाऐवजी अधूनमधून नुसती रिमझिम सुरू आहे. आकाशात ढग दाटून येतात; परंतु समाधानकारक पाऊस पडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
मराठवाड्यातील ७६ पैकी ४० तालुक्यांमध्ये पावसाने आतापर्यंत अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील अवघ्या दोन तालुक्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, फुलंब्री तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या अनुक्रमे १०२.८ आणि १०४.४ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात १५४.६० तर फुलंब्री तालुक्यात १५९.७५ मिलिमीटर पाऊस झाला. अन्य सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १ जून ते ३ जुलैदरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७१.८ टक्के पाऊस झाला आहे.
जून महिन्याच्या प्रारंभीच जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. १ आणि २ जून असा दोन दिवस दमदार बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर जून महिना अर्धा उलटल्यावर थेट २१ जून रोजी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. आता कुठे समाधानकारक पाऊस पडेल,अशी आशा व्यक्त होत असताना पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. अवघे दोन दिवस जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर ओसरला. जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असून, गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा केवळ अवघ्या काही मिनिटांसाठी शिडकावा होत आहे. काही दिवस पावसाचा खंडही पडल्यामुळे पावसाच्या टक्केवारीत घट झाली आहे. परिणामी शेतकºयांकडून चिंता व्यक्त होत आहे.
पुढील आठवड्याची प्रतीक्षा
तीन दिवसांनंतर मंगळवारी (दि.३) शहर आणि परिसरात पुन्हा एकदा काही मिनिटांसाठी पावसाने हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत या पावसाची काहीही नोंद झाली नाही.
७ जुलैनंतर जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल,असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे किमान पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात पडलेला पाऊस (३ जुलैपर्यंत)
तालुका पाऊस टक्केवारी
(मि.मी)
औरंगाबाद १५४.६० १०२.८
फुलंब्री १५९.७५ १०४.५
पैठण ८४.८० ६३.९
सिल्लोड ८७.५० ५९.८
सोयगाव ११४.३३ ६९.२
वैजापूर ९१.७० ८६.४
गंगापूर ७१.८९ ५१.३
कन्नड १०२.६३ ६२.३
खुलताबाद ८७.३३ ५१.३