औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:20 AM2018-07-10T01:20:01+5:302018-07-10T01:20:23+5:30
मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबईसह अन्य ठिकाणी धुवाधार पाऊस कोसळत असताना औरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची वाट पाहावी लागत आहे. जिल्ह्यात केवळ औरंगाबाद तालुक्यात पावसाने आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. ९ जुलैपर्यंत १८३.१० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २०२.१० मि.मी. म्हणजे ११०.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील फुलंब्री तालुकाही सरासरीच्या जवळ आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही पावासाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून पाठ फिरविलेल्या पावसाने ५ जुलै रोजी पुन्हा एकदा परतत जोरदार हजेरी लावली. शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुऊन काढलेल्या पावसाने शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत ४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने औरंगाबाद तालुक्यातील सरासरी ओलांडली आहे; परंतु त्यानंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यातील फुलंब्री तालुका १८०.२५(९६.१८ टक्के) , पैठण ८९.०० (५५.८० टक्के) , सिल्लोड ११२.०६ (६१.२० टक्के) , सोयगाव १४९.९९ (७४.५५ टक्के), कन्नड १२२.१८ ( ६०.२२ टक्के), वैजापूर १०६.४० (८२.१० टक्के), गंगापूर ९०.५६ ( ५४.५५), तर खुलताबाद तालुक्यात १००.६५ (४८.१८ टक्के) मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात ५ जुलै रोजी बरसलेल्या दमदार पावसाने बळीराजा कुठेतरी सुखावला होता; मात्र यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली असून, अधूनमधून केवळ रिमझिम पाऊस होत आहे. पुणे हवामान विभागाने १०, ११ जुलै रोजी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
एमजीएम खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधक र म्हणाले, औरंगाबाद, जालना जिल्ह्यात सध्या पाऊस नसला तरी १४ ते १७ जुलैदरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये १६ ते १८ जुलैदरम्यान मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.