औरंगाबादचे रायगड संघावर वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:48 AM2017-12-26T00:48:06+5:302017-12-26T00:48:30+5:30
जबरदस्त सूर गवसलेला उदयोन्मुख प्रतिभावान फलंदाज संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज तनुज सोळुंकेचे ४ बळी या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादने रायगड संघाविरुद्ध आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली आहे.
औरंगाबाद : जबरदस्त सूर गवसलेला उदयोन्मुख प्रतिभावान फलंदाज संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी आणि फिरकी गोलंदाज तनुज सोळुंकेचे ४ बळी या जोरावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे सुरू असलेल्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादने रायगड संघाविरुद्ध आपली पकड पहिल्याच दिवशी मजबूत केली आहे.
एडीसीए स्टेडियमवर आज सकाळी औरंगाबादने प्रथम फलंदाजी करताना ६४.४ षटकांत सर्वबाद २१३ धावा फटकावल्या. औरंगाबादकडून संकेत पाटील याने ७३ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकारांसह ५५ आणि यशोवर्धन पवार याने ६६ चेंडूंत ४ चौकारांसह ४० धावांची खेळी केली. अंश ठोकळने ६ चौकार व ऋषिकेश कुंदे याने ४ चौकारांसह प्रत्येकी ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. संकेत पाटील याची सुरेख अर्धशतकी खेळी हे औरंगाबादच्या फलंदाजीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. याआधीच्या नांदेडविरुद्ध ६३ धावांची झुंजार खेळी करणाºया संकेत पाटील याने डोळ्यांचे पारणे फेडणारे कव्हरड्राईव्ह आणि पूलचे आकर्षक चौकार मारताना रायगड संघाविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवताना तंत्रशुद्ध फलंदाजी करताना यशोवर्धन पवार याच्या साथीने दुसºया गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी करताना औरंगाबादच्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. रायगड संघाकडून मानस लाले याने ३८ व हर्षवर्धन मोहिते यांनी अनुक्रमे ३८ व ३४ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात उतरलेल्या रायगड संघाची तनुज सोळुंके याच्या सुरेख फिरकी गोलंदाजीसमोर दिवसअखेर ५ बाद ७० अशी स्थिती झाली आहे. रायगडकडून ओम कुलकर्णी याने ४४ चेंडूंत ३ चौकारांसह सर्वाधिक ३० धावा केल्या. औरंगाबादकडून तनुज सोळुंके याने १६ धावांत ४ गडी बाद केले. सुजल राठोडने ६ धावांत १ गडी बाद करीत त्याला साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
औरंगाबाद (पहिला डाव) : ६४.४ षटकांत सर्वबाद २१३. (संकेत पाटील ५५, यशोवर्धन पवार ४०, अंश ठोकळ ३०, ऋषिकेश कुंदे ३०. मानस लाले २/३८, हर्षवर्धन मोहिते २/३४).
रायगड (पहिला डाव) : ५ बाद ७०. (ओम कुलकर्णी ३०, तनुज सोळुंके ४/१६, सुजल राठोड १/६).