औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलांना जडले नशेचे व्यसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:41 PM2018-09-24T13:41:26+5:302018-09-24T13:42:17+5:30
झोपडपट्टी भागांतील दहा ते पंधरा-सोळा वयाच्या मुलांना व्हाईटनर, सुलोचन आणि मादक गोळ्या सेवन करण्याचे व्यसन जडत असल्याचे समोर आले.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : झोपडपट्टी भागांतील दहा ते पंधरा-सोळा वयाच्या मुलांना व्हाईटनर, सुलोचन आणि मादक गोळ्या सेवन करण्याचे व्यसन जडत असल्याचे समोर आले. मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील या मुलांकडे आई-बाबांचे दुर्लक्ष होऊन ते नशेच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाले. या मुलांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.
शहरातील विविध झोपडपट्टी वसाहतीत व्हाईटनर, सोल्युशन आणि अन्य प्रकारे नशा करणारे अल्पवयीन मुले फिरताना दिसतात. हातात रु माल अथवा जुन्या कपड्यात व्हाईटनर अथवा सोल्युशन टाकून ही मुले नशा करताना नजरेस पडतात. आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे ही मुले नशेच्या आहारी जात आहेत. व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलांचा आहार कमी होतो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याने त्यांची नैैसर्गिक वाढ खुंटलेली आहे. व्हाईटनर हे सहज कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात उपलब्ध असल्याने त्याचा गैरफायदा ही मुले घेत असल्याचे विशेष शाखेचे निरीक्षक शेषराव उदार यांनी सांगितले.
आई-वडिलांचे दुर्लक्ष मुख्य कारण
नशेचे व्यसन जडलेल्या मुलांचे वडील मजुरी करतात, तर आई धुणीभांडीसारखी कामे करते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्याही अधिक असते. बहुतेक मुलांच्या वडिलांना दारू अथवा गांजाचे व्यसन जडलेले असते. व्यसनी आणि कामात व्यग्र आई-वडिलांचे आपल्याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहून ही मुले शाळेला दांडी मारून वाईट मित्रांच्या संगतीत आल्याने त्यांना नशेचे व्यसन जडल्याचे दिसून आले. अपत्यांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक मुलांवर नजर ठेवणे आणि त्यांचे योग्य संगोपन होत नाही.
अनेकांनी शाळांही सोडल्या
आठ दिवसांत पोलिसांनी ५२ मुलांना व्हाईटनर, सुलोचनची नशा करताना पकडले. यातील बहुतेक मुलांनी शाळा सोडल्याचे दिसून आले. तर काही मुले शाळेला सतत दांडी मारतात. मुलांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे ही बाब मुलांच्या आई-बाबांना माहीत नाही.
या ठिकाणी फिरतात ही मुले
औरंगाबादेत शताब्दीनगर, मिलिंदनगर, उस्मानपुरा, छोटा मुरलीधरनगर, राजनगर, मुकुंदवाडी, रेल्वेस्टेशन परिसर, राजीवनगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन, हमालवाडा, हिमायतबाग परिसर, घाटी रुग्णालय, सिद्धार्थ उद्यान.
दुकानदारांना नोटिसा
अल्पवयीन मुलांना व्हाईटनर विक्री करणाऱ्या दुकानांची नावे आम्हाला मिळाली आहेत. या दुकानदारांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात येत आहेत, यापुढे मुलांना व्हाईटनर विक्री केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
- शेषराव उदार, पोलीस निरीक्षक