औरंगाबाद पूर्व मतदारसंघ: मतदान अडीच टक्क्यांनी घटले; कोणत्या उमेदवाराला फटका?
By विकास राऊत | Published: November 22, 2024 02:38 PM2024-11-22T14:38:41+5:302024-11-22T14:42:44+5:30
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असताना औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मात्र २०१९ च्या तुलनेत सुमारे अडीच टक्के मतदान घटले आहे. घटलेल्या या मतदानाचा कुणाला फटका बसणार हे शनिवारी समजेल. मतदारसंघातील ३२२ पैकी १५८ केंद्रांवर ६० ते ७५ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
२०१९ मध्ये या मतदारसंघात ६३.२ टक्के मतदान झाले होते. २०२४ साली ते ६०.६३ टक्के झाले. अडीच टक्क्यांनी मतदान घटले याचा अर्थ एकूण मतदानाच्या तुलनेत सुमारे ११ हजार मतदान कमी झाले आहे. लाडकी बहीण योजना आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा उत्साह अधिक असेल असे वाटत असताना मतदान कमी झाल्याने उमेदवारांनाही चिंता लागली आहे.
मुस्लीमबहुल भागातील सुमारे १२२ पैकी ९० मतदान केंद्रांवर ६० ते ७५ तर ३२ केंद्रांवर ४० ते ६० टक्के मतदान झाले. दुसरीकडे हिंदू व दलितबहुल भागातील सुमारे २०० पैकी ६८ केंद्रांवर ६० ते ७५ टक्के तर १३२ बूथवर ६० टक्क्यांच्या आत मतदान झाल्याचे केंद्रनिहाय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसचे लहू शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह २९ उमेदवारांमध्ये लढत झाली असली तरी एमआयएम आणि भाजपमध्येच खरा सामना आहे. एकूण ३ लाख ५४ हजार ६३३ मतदारांपैकी २ लाख १५ हजार २९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १ लाख १४ हजार १०४ पुरुष तर १ लाख ९२१ महिला मतदारांनी मतदान केले. १ लाख ३९ हजार ६०४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. कैसर कॉलनीत केंद्र क्रमांक ६८ मध्ये सर्वाधिक ७७.२४ टक्के मतदान झाले. तर, एमजीएम संस्कार महाविद्यालयात सर्वांत कमी ३७.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. बोगस मतदानावरून भाजप आणि एमआयएममध्ये राडा झाला. त्या भारत नगरमधील पं.जवाहरलाल नेहरू महाविद्यालय या केंद्रावर ५७.०१ टक्के मतदान झाले.
भाजपची भिस्त कशावर?
या मतदारसंघातील मराठा समाजाचे मतदान कुणीकडे जाते, याविषयी मोठी चर्चा होती. मतदारसंघात सुमारे ३८ ते ४२ हजार मराठा मतदान आहे. यातील सुमारे २४ हजार मतदान झाल्याची चर्चा आहे. हे मतदान कुठे जाते, यावर भाजपची भिस्त होती. २० ते ४० वयाेगटातील मराठा मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात सूर होता. मात्र, त्यापुढील वयाच्या मतदारांचे मतदान मिळाल्याचा भाजपाचा दावा आहे. मराठा समाजाचे मतदान काँग्रेस, एमआयएम, भाजप आणि नोटामध्ये विभागले गेल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. ठाकरे गटाने देखील एमआयएमला सहकार्य केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. विभागलेल्या मतांची भर दलित व ओबीसी मतदानातून भरून निघेल, अशीही अपेक्षा भाजपला आहे. ओबीसी, दलित आणि काही अंशी मराठा मतदान मिळेल, यावरच त्यांची आकडेमोड गुरुवारी सुरू होती.
एमआयएमची मदार कुणावर?
एमआयएम पक्षाची मदार मुख्यत्त्वे मुस्लीम मतदारांवर अवलंबून होती. मात्र, १६ मुस्लीम उमेदवार उभे असल्याने हक्काची व्होट बँक विभागली गेली. दलित मतांची काही प्रमाणात साथ मिळेल, अशी एमआयएमला अपेक्षा होती. मात्र, ती मते प्रामुख्याने ‘वंचित बहुजन आघाडी’ची आहेत. मतदारसंघात ‘वंचित’चा उमेदवार असल्याने ती मते एमआयएमकडे कितपत वळली असतील याविषयी शंका आहे. शिवाय अखेरच्या क्षणी भाजप नको म्हणून मराठा समाजाची मते एमआयएमकडे वळतील, अशी अटकळ होती. मात्र, प्रत्यक्षात मराठा समाजाची मते विखुरली गेल्याने त्याचा एमआयएमला मोठा फायदा मिळाला नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.