औरंगाबाद ‘पूर्व’मध्ये सर्वाधिक मुस्लीम उमेदवार, तरी सावे-जलील यांच्यातच खरी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:38 PM2024-11-08T19:38:46+5:302024-11-08T19:38:58+5:30
एमआयएमसमोर शेवटच्या क्षणापर्यंत व्होटबँक टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. कारण १६ उमेदवार मुस्लीम असल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २९ उमेदवार असून, त्यात १६ मुस्लीम उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी खरी लढत महायुतीतील भाजपचे उमेदवार अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातच होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे लहूजी शेवाळे, वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान, समाजवादी पार्टीचे डॉ. गफ्फार कादरी आणि बसपाच्या शीतल बनसोडे हेदेखील मैदानात आहेत. भाजप व महायुतीचे उमेदवार गृहनिर्माणमंत्री अतुल सावेऔरंगाबाद पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात आहेत. २०१४, २०१९ ला या मतदारसंघातून विजय मिळविल्यानंतर यावेळी ते हॅटटिक साधतील की नाही, याकडे लक्ष आहे. मतदारसंघात १६ मुस्लीम उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे मतविभाजन किती प्रमाणात होते, त्यावर महायुतीची भिस्त आहे, तर महाविकास आघाडीला मुस्लीम, दलितांसह हिंदू मतांचा आधार हवा आहे. एमआयएमसमोर शेवटच्या क्षणापर्यंत व्होटबँक टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. कारण १६ उमेदवार मुस्लीम असल्यामुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या (४ नोव्हेंबर) दिवशी फक्त १० मुस्लीम उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एमआयएमला मतदारसंघात परिश्रम करावे लागणार, हे निश्चित आहे. युती, आघाडी आणि एमआयएम असेच चित्र सध्या आहे.
२०१४ सारखी परिस्थिती...
यावेळी मतदारसंघात २०१४ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस, एमआयएम आणि भाजप अशा थेट लढतीचे चित्र सध्या आहे. २०१९ ला पूर्व मतदासंघातून सर्वाधिक उमेदवार होते. यावेळीदेखील तशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक २९ उमेदवार पूर्व मतदारसंघात आहेत. ३ लाख ५२ हजार ३१३ मतदारांचा हा मतदारसंघ आहे. यात पुरुष मतदार १ लाख ८२ हजार ५२७, तर महिला मतदार १ लाख ६९ हजार ७७२ असून, १४ दिवसांत सर्व उमेदवारांना या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागेल.