औरंगाबाद : ईद-उल-फित्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:19 AM2018-06-17T00:19:16+5:302018-06-17T00:20:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि जवळपास ७५ मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि जवळपास ७५ मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली. नमाजपूर्वी सकाळी ‘फितरा’ आणि ‘जकात’ देऊन नमाज अदा करण्यात आली. तर नमाजनंतर परस्परांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जात होत्या.
छावणीतील ईदगाहमध्ये जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीर साहब यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या जमावाने ईदची मुख्य नमाज अदा केली. तत्पूर्वी मोईज फारुकी, नुमार्इंदा कौन्सिलचे नोमान नदवी, जमाते इस्लामीचे मौलाना इलियास पलाही तसेच मौलाना महंमद मजिदुद्दीन फारुकी यांनी प्रास्ताविकपर बयान केले. त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे, रोजांचे, खैरात आणि फितराचे महत्त्व विशद केले.
छावणी ईदगाहसमोर वक्फ बोर्डातर्फे उभारण्यात आलेल्या मंडपात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि रामेश्वर थोरात, तसेच नामदेव पवार, माजी महापौर रशीद खान (मामू), मनमोहनसिंग ओबेरॉय आणि अशोक सायन्ना यादव, डॉ. खुशालचंद बाहेती, नगरसेविका कीर्ती शिंदे, महेंद्र शिंदे, डॉ.जफरखान, पंकज फुलफगर, मजीदुल्ला बर्कतुल्ला, मतीन अहेमद, शेख युसूफ, इब्राहिमभाई पटेल, रफिक अहेमद, शिवनाथ राठी, अॅड. अक्रम खान, बबन डिडोरे, डॉ. पवन डोंगरे, जेम्स अंबिलढगे, दौलतराव मोरे, डॉ. डॉन अंबिलढगे, मनोज निर्मळ, कमाल खान पठाण, जितेंद्र देहाडे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
नमाजनंतर भाविकांनी कब्रस्तानात जावून त्यांच्या पूर्वजांच्या कबरेवर फुले वाहून दुआ केली.
छावणीतील कब्रस्तान समितीचे चेअरमन अब्दुल वहीद, सचिव हमीद खान, सहसचिव इक्बाल खान, सदस्य अश्फाक खान, आमेर खान इक्बाल खान, एम .ए. अजहर, रफिक अहेमद, शेख कासीम आदींनी ईदगाहची साफसफाई, रंगरंगोटी, नमाजसाठी उपस्थित भाविकांच्या बैठकीची व्यवस्था आणि महापालिकेने ‘वजू’ साठी पाण्याची व्यवस्था केली.