‘ऑलिवूड’ला जन्म देणार औरंगाबाद चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 11:41 AM2020-02-06T11:41:39+5:302020-02-06T11:45:20+5:30

सिनेकलावंतांच्या मांदियाळीत ७ व्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

Aurangabad Film Festival to give birth to 'Ollywood' | ‘ऑलिवूड’ला जन्म देणार औरंगाबाद चित्रपट महोत्सव

‘ऑलिवूड’ला जन्म देणार औरंगाबाद चित्रपट महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय अनुदानाशिवाय महोत्सव यशस्वी औरंगाबादकरांचा उदंड प्रतिसाद

औरंगाबाद : राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविलेले मातब्बर दिग्दर्शक, मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये कार्य केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी सदस्य यांच्या मांदियाळीत ७ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली आणि सिनेमाप्रेमी औरंगाबादकरांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लवकरच ‘बॉलिवूड’, ‘मॉलिवूड’ इतकेच काय तर ‘हॉलिवूड’ या संकल्पना मागे पडून औरंगाबादचे ‘ऑलिवूड’ उदयास येईल, असा विश्वास मंचावरील मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केला.

मागील कित्येक दिवसांपासून औरंगाबादकरांसह अवघा मराठवाडाच ज्या सोहळ्याची वाट पाहत होता तो औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बुधवारी (दि. ५) मोठ्या थाटात सुरू झाला. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, औरंगाबादतर्फे आयोजित महोत्सव सायं. ६ च्या सुमारास ‘रेड कार्पेट’सह स्वागत करून सिनेकलावंतांच्या झगमगाटात प्रोझोन आयनॉक्स येथे सुरू झाला. यावेळी व्यासपीठावर हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, ‘हेल्लारो’ या सुवर्णकमळ विजेत्या राष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, ‘तान्हाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते प्रसाद ओक, अभिनेते चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महोत्सवाचे मुख्य आयोजक नाथ ग्रुपचे नंदकिशोर कागलीवाल, सतीश कागलीवाल, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, रंगकर्मी अजित दळवी, ज्युरी सदस्य एरिअर ग्रे हर्बट, ब्यॉर्न होमग्रेन यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. याशिवाय प्रेमेंद्र मुजूमदार, जितेंद्र मिश्रा, श्रीकांत बोजेवार, व्ही. के. जोसेफ, नम्रता जोशी, रेखा देशपांडे, सतीश सूर्यवंशी यांचीही विशेष उपस्थिती होती.

औरंगाबादकरांची सिनेमाप्रती असणारी ओढ पाहून सिनेमाच्या जागतिक नकाशात औरंगाबाद नक्कीच मानाचे स्थान पटकावणार, असे उपस्थिताना मनोमन वाटून गेले. महोत्सवासाठी तयार क रण्यात आलेली बहारदार ‘थीम साँग’ पाहूनच उपस्थिताना चित्रपट पाहण्याची ओढ लागली होती. प्रास्ताविक करताना नंदकिशोर कागलीवाल यांनी औरंगाबादच्या ‘ऑलिवूड’ची संकल्पना सांगून या चित्रपट महोत्सवाच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीची जणू नांदीच दिली. औरंगाबाद चित्रपट महोत्सव येत्या काही काळात औरंगाबादची ओळख बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी सुरू केलेला औरंगाबाद चित्रपट महोत्सव आज ज्या पद्धतीने वाटचाल करतोय, याबाबत आनंद वाटत असल्याचे अंकुशराव कदम यांनी सांगितले. महोत्सवात दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांची माहिती देणाऱ्या ‘कॅटलॉग’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धा जोशी यांनी स्वागतगीत गायले. वेदांग कुलकर्णी आणि स्वराज पाटील यांनी त्यांना साथसंगत केली.


शासकीय अनुदानाशिवाय महोत्सव यशस्वी
शासनाचे कोणतेही अनुदान न घेता औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावरूनच औरंगाबादकरांची अभिरुचीसंपन्नता दिसून येते, असे गौरवोद्गार चंद्रकांत कुलकर्णी यांनी काढले आणि फक्त मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या औरंगाबादमध्ये मात्र एकही रंगमंदिर नाही, प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. चित्रपट हा स्वत:च एक संवाद असल्यामुळे त्यात भाषा गौण ठरते, असे सांगत ‘हेल्लारो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शहा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आजही अनेक महिला कुणाची तरी परवानगी नाही म्हणून जीवनातील लहान- सहान आनंदापासून वंचित राहतात. याची कहाणी सांगणाऱ्या आपल्या ‘हेल्लारो’ चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होत आहे, हे आपल्यासाठी विशेष आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

सिनेमाप्रेमी औरंगाबादकर
जागतिक दर्जाचे चित्रपट महोत्सव पाहतो, तेव्हा आपल्याकडे असा महोत्सव कधी होईल, असे मला वाटायचे. हे माझे स्वप्न आज सिनेमाप्रेमी औरंगाबादकरांनी पूर्ण केले आहे. इथे सिनेमावर प्रेम करणारी माणसे आहेत म्हणून महोत्सव इतका बहारदार होत आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आपले विदेशातील अनेक मित्र औरंगाबाद चित्रपट महोत्सव पाहण्यासाठी उत्सुक आहेत, असे सांगितले.

मराठी चित्रपट बनविण्यास उत्सुक
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आपण पहिल्यांदाच आलो असून, इथला जल्लोष आणि सिनेमाप्रतीची ओढ पाहून आपण हरखून गेलो आहोत. आजवर मराठीमध्ये चित्रपट बनविला नाही, पण आता तो बनविण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरण सांगणारा ‘हेल्लारो’
महोत्सवाच्या  उद्घाटनानंतर सुवर्ण कमळ विजेता चित्रपट ‘हेल्लारो’ रसिकांना गुजराती संस्कृतीची झलक दाखविणारा आणि महिला सशक्तीकरणाची अनोखी झलक दाखविणारा ठरला. गरबा नृत्याच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले प्रगल्भ भाव आणि लोककलांच्या माध्यमातून उलगडत जाणाऱ्या अभिनेत्रींची कथा आणि व्यथा भावुक करणारी ठरली. ‘हेल्लारो’ मधून गुजराती संस्कृतीची अप्रतिम झलक पाहणे, मोठेच रंजक ठरले.

Web Title: Aurangabad Film Festival to give birth to 'Ollywood'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.