औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:33 PM2018-01-04T19:33:00+5:302018-01-05T08:11:17+5:30
भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे, अनिल दवे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात दंगल करणे, मारहाण करणे, वाहनांचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औरंगाबाद : भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी औरंगाबादेतून गेलेल्या पथकावर हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे अनिल दवे यांच्यासह 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दंगल करणे, मारहाण करणे, वाहनांचे नुकसान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा पुणे ग्रामीणमधील शिक्रापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावसिंगपुरा परिसरातील पेठेनगर येथील रहिवासी जयश्री सुदाम इंगळे या अन्य काही सहकार्यांसह 1 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपींनी तक्रारदारांची गाडी अडवून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांचा वर्षाव करून गाडीच्या काचा फोडल्या. तसेच तक्रारदार यांना जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादीसोबतच्या एकाने तहान लागल्याने आरोपींना पाणी मागितले असता त्यांनी पाणी देण्यास नकार देत त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
औरंगाबादला परतल्यानंतर तक्रारदार यांनी 3 जानेवारीला रात्री छावणी पोलीस ठाणे गाठून उपायुक्त विनायक ढाकणे, छावणी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पुरी यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार नोंदविली. छावणी पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेत पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याला वर्ग केली. या गुन्ह्याचा तपास आता शिक्रापूर पोलीस करणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.