जर्मनीनंतर भारतात पहिल्यांच औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:02 AM2020-12-25T04:02:01+5:302020-12-25T04:02:01+5:30
मणक्यासह शरीरात पस : ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर महिला चालत गेली घरी औरंगाबाद : जगभरात कोराेनाचा विळखा ...
मणक्यासह शरीरात पस : ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर महिला चालत गेली घरी
औरंगाबाद : जगभरात कोराेनाचा विळखा कमी होण्याची आशा असतानाच ब्रिटनमधील नव्या विषाणूच्या जन्माने नवे संकट उभे राहिले. या सगळ्यात जर्मनीतील ६ रुग्णांनंतर भारतात पहिल्यांदाच औरंगाबादेत कोरोना होऊन गेलेल्या महिलेच्या शरीरात मणक्यासह विविध अवयवांत पस (पू) झाल्याचे आढळले. एमआरआय तपासणीतून ही बाब उघड झाली. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न, ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर ही महिला रुग्णालयातून चालत घरी गेली.
शहरातील न्यू बालाजीनगरातील ३९ वर्षीय महिला या स्थितीला सामोरे जाऊन आता बरी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सदर महिला पाठदुखी, कंबरदुखीने त्रस्त होती. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मणकाविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत दहिभाते यांच्याकडे उपचार सुरू असताना ‘एमआरआय’द्वारे तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्या मणक्यात, पोटात, दोन्ही हातात आणि शरीरातील अन्य भागांत पस झाल्याचे आढळले. डॉ. दहिभाते यांनी त्यांच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला. तेव्हा कोरोनामुळे असा परिमाण होत असल्याचे आणि आतापर्यंत जर्मनीत असे ६ रुग्ण आढळल्याचे समोर आले.
कोरोना होऊन गेलेला; पण कळलेही नाही
सदर महिलेला कोरोनाचे निदान झालेले नव्हते. शिवाय कुटुंबातही कोणाला कोरोनाची लागण झालेली नव्हती; परंतु ॲन्टी बाॅडी टेस्ट करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांच्या शरीरावर असा परिणाम होत असल्याचे समोर आले. यानंतर महिलेवर उपचाराचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. ते आव्हान पेलत डॉ. श्रीकांत दहिभाते, डॉ. रजनीकांत जोशी आणि डॉ. प्रसाद वैद्य यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेचा जीव वाचविला.
५०० मि.लि. पस काढला
सदर महिलेचा मणका आणि शरीरातील अन्य अवयवातून तब्बल ५०० मि.लि. पस काढण्यात आला. मणक्याची शस्त्रक्रिया ३ तास चालली. दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली.
पूर्ण शरीरात संक्रमण
संक्रमण महिलेच्या पूर्ण शरीरामध्ये पसरले होते. जिवाचा धोका होता. तात्काळ शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरला होता. एक नाही तर तब्बल तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. २ दिवस रुग्ण कृत्रिम श्वासावर अतिदक्षता विभागात होता. शेवटी २१ व्या दिवशी हसऱ्या आणि आनंदी चेहऱ्याने रुग्ण चालत घरी गेला. कोरोना झाल्यानंतर मणक्यामध्ये आणि शरीरामध्ये असे संक्रमण होणारा हा जगातील ७ वा आणि भारतातील पहिला रुग्ण आहे.
- डॉ. श्रीकांत दहिभाते, मणकाविकारतज्ज्ञ
----
फोटो ओळ...
डॉ. श्रीकांत दहिभाते, मणकाविकारतज्ज्ञ
शस्त्रक्रिया करताना डॉक्टर.