औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:02 AM2021-07-08T04:02:12+5:302021-07-08T04:02:12+5:30
औरंगाबाद: दोन वेळा शहराचे महापौरपद भुषविलेले आणि अवघ्या सव्वा वर्षांपूर्वी राज्यसभेचे खासदार झालेले डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादला ...
औरंगाबाद: दोन वेळा शहराचे महापौरपद भुषविलेले आणि अवघ्या सव्वा वर्षांपूर्वी राज्यसभेचे खासदार झालेले डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षाच्या कालावधीत डॉ. कराड यांना मिळालेले मंत्रिपद ही आश्चर्यजनक बाब असली तरी मागील काही दिवसांत त्यांनी पक्षासोबत ठेवलेली बांधीलकी आणि विशेष करून राज्यातील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याशी साधलेली जवळीक त्यांच्या कामी आल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मराठवाड्यातून एकाची वर्णी लागणार, याची चर्चा मागील काही दिवसांपासून होती. डॉ. कराड आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती; मात्र त्यामध्ये डॉ. कराड यांनी बाजी मारली. सरळसाधे वाटणारे डॉ. कराड हे चाणाक्षही असल्याची प्रचिती यामुळे आली.
औरंगाबादच्या दृष्टीने डॉ. कराड यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा शहराच्या आगामी काळातील योजनांच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. औरंगाबादचे खासदार म्हणून आतापर्यंत चंद्रकांत खैरे यांनी चार वेळा खासदारपद भूषविले; मात्र तरीही त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकला नाही. ६५ वर्षीय डॉ. कराड यांची नगरसेवक ते खासदार (व्हाया महापौर) आणि आता केंद्रीय मंत्री अशी २४ वर्षांची कारकीर्द आहे. मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन असलेल्या डॉ. कराड यांनी १९९५ साली नगरसेवक होण्याआधी लायन्स क्लबच्या माध्यमातून आपले सामाजिक काम सुरू ठेवले होते. त्याचा फायदा त्यांना नगरसेवक होण्यामध्ये झाला. त्यानंतर १९९६ साली ते भाजपमध्ये आले आणि तिथून त्यांची राजकीय कारकीर्द आणखी बहरत गेली. गरिबी पाहिलेला आणि कोणताही अभिनिवेष नसलेला नेता म्हणून डॉ. कराड यांची ख्याती आहे. एक डॉक्टर, उद्योजक, संघटक आणि सामाजिक कार्यकर्ता अशा विविध अंगांनी त्यांच्या कारकीर्दीकडे पाहिले जावू शकते. कुणाविषयीही कटूता बाळगायची नाही, या त्यांच्या गुणाचा त्यांना राजकारणात मोठा फायदाच झालेला आहे. यामुळेच औरंगाबाद शहराचे दोन वेळा महापौरपद त्यांना भूषविता आले.
चौकट..
मुंडेंचे सहकार्य
औरंगाबामध्ये एकेकाळी शिवसेनेचे वर्चस्व राहिले असताना दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांनी पक्षविस्ताराच्या दृष्टीने डॉ. कराड यांना पक्षात आणले. मुंडे यांच्या आशीर्वादामुळे ते दोन वेळा महापौरही झाले. गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर डाॅ. कराड यांनी पंकजा मुंडे यांना नेता मानले. पंकजा राज्यात मंत्री असताना डॉ. कराड त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे चित्र होते; मात्र २०२० साली पंकजा यांनी औरंगाबादमध्ये स्वकीयांविरुद्ध जो एल्गार पुकारला त्यानंतर पंकजा पक्षापासून काहीशा दूर झाल्या. याचवेळी राजकीय दिशा डाॅ. कराड यांनी ओळखली आणि राज्यात भाजपमध्ये प्रभावी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढविली आणि त्याचा पुरेपूर फायदाही त्यांना झाला. भाजपमधून वंजारी समाजाच्या नेत्याला संधी द्यायची झाल्यास मुंडेंच्या घरात द्यायची नाही, या भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतलेल्या धोरणाचाही डॉ. कराड यांना फायदा झाल्याचे दिसते.
जात आणि शिक्षण घटक ठरले महत्त्वाचे
डॉ. कराड यांना मंत्रिपद मिळण्यामध्ये जात आणि त्यांचे वैद्यकीय उच्च शिक्षण हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे ठरले. मराठवाड्यातून ओबीसी घटकाला आणि विशेष करून वंजारी समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्यासंदर्भाने भाजपमध्ये विचार झाल्यानंतर खा. प्रीतम मुंडे यांना डावलून डॉ. कराड यांना संधी देण्यात आली. शिवाय कोरोना काळात त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा, या हेतूने त्यांची वर्णी लागली आहे.