औरंगाबाद : हनुमान मंदिर कलश मिरवणुकीवर मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:31 AM2022-05-06T11:31:59+5:302022-05-06T11:44:02+5:30
औरंगाबादच्या लाडसावंगी येथील सामाजिक सौहार्दाचे उदाहरण
लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : राज्यात सुरू असलेल्या भोंगावादाचा ग्रामीण भागात मात्र कुठलाही परिणाम दिसत नाही. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथेही सामाजिक सौहार्द जपण्याची एक घटना गुरुवारी घडली. गावातील हनुमान मंदिराच्या कलशारोहण समारंभासाठी निघालेल्या मिरवणुकीवर गावातील मुस्लीम समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करून एकतेचा संदेश दिला.
राज्यात मशिदींमध्ये होणाऱ्या अजानविरोधात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र ग्रामीण भागातील वातावरणावर याचा कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. लाडसावंगी गावात हनुमान मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला. नव्याने बांधलेल्या मंदिरात ५ ते ७ मे दरम्यान धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गुरुवारी सकाळी गावात रथामधून कलश मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी नऊच्या सुमारास मिरवणूक गावातील मुस्लीम बागवान गल्लीत आली असता, मिरवणुकीवर हाजी अहेमद शेख, फेरोज बागवान, कलीम शेख, डॉ. अकबर शेख, सलीम शेख, आरेफ बागवान, जफर बागवान, अल्ताफ बेग, अफजल शेख, समीर सय्यद, आदींनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणूक सुरू असताना मुस्लीम गल्लीत अचानक झालेल्या पुष्पवृष्टीने भाविकही आनंदित झाले. मंदिरात शुक्रवारी कलश स्थापना व शनिवारी नंदी प्राणप्रतिष्ठा करून महाप्रसाद व नंतर रात्री आठ वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार आहे.
एकमेकांच्या सुखदु:खांत होतात सहभागी
लाडसावंगी हे गाव औरंगाबाद तालुक्यात मोठे असून हिंदू व मुस्लीम यांची संख्या मोठी आहे; परंतु या गावात आजपर्यंत कधीही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही. उलट एकमेकांच्या सुखदु:खांत सर्वजण सहभागी होतात. बाहेर कुठेही तणाव निर्माण झाला तरी, गावात याचा कधीही, काहीही परिणाम जाणवत नाही.