फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये औरंगाबाद चौथ्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:06 PM2018-10-02T14:06:00+5:302018-10-02T14:06:31+5:30
भारतातील कर्करोग संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित आहेत.
औरंगाबाद : फुफ्फुसाच्या कर्करोगातऔरंगाबाद राज्यात चौथ्या स्थानी असल्याची धक्कादायक माहिती भारतीय कर्करोग संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. एक लाख लोकसंख्येत ५.९ टक्के रुग्ण आढळून आले आहेत.
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण हे धूम्रपान आणि हवेतील प्रदूषण आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगांपैकी सुमारे ७ टक्के रुग्ण हे एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाला बळी पडतात. भारतातील कर्करोग संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित आहेत. यात पहिल्या स्थानावर मुंबई (१०.३ टक्के), दुसऱ्या स्थानावर नागपूर (८.८ टक्के) आहे. तिसऱ्या स्थानी पुणे (७.८ टक्के) आणि चौथ्या स्थानी औरंगाबाद (५.९ टक्के) असल्याचे समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात फुफ्फुसाच्या आजाराने भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. १०० कर्करोगाच्या रुग्णांत १३ रुग्ण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित असतात. भारतात दरवर्षी या कर्करोगाच्या ७० हजारांवर रुग्णांची नोंद होते. महाराष्ट्रातही याचे प्रमाण अधिक आहे. चौथ्या स्थानी असल्याने शहरातही याचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. युवकांना धूम्रपान न करण्यास प्रेरित करणे, धूम्रपानाच्या व्यसनातून लोकांची सुटका करणे, यावर भर देण्याची गरज आहे. धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात राहिल्यानेही परिणाम होतो. त्यामुळे धुराचे सान्निध्य टाळण्यावर भर दिला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
क्रमांक एक होऊ नये
फुफ्फुसाच्या कर्करोगात औरंगाबाद चौथ्या स्थानी आहे, ते क्रमांक एकवर येऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. हवेचे प्रदूषण आणि धूम्रपान या दोन्ही गोष्टींपासून दूर आणि बचाव केला पाहिजे.
- डॉ. सुशांत मेश्राम, क्षय व उररोग विभाग, मेडिकल, नागपूर