महावीर जयंतीनिमित्त औरंगाबादेत कचरा, प्लास्टिकमुक्त रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:58 AM2018-03-27T00:58:55+5:302018-03-27T00:59:40+5:30
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.
औरंगाबाद : सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत भगवान महावीर जन्मोत्सव समितीतर्फे देण्यात आली.
सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आ़ सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, कार्याध्यक्ष मुकेश साहुजी, भारती बागरेचा, रमेश घोडके, मिठालाल कांकरिया, भावना सेठिया, अनिल संचेती, करुणा साहुजी, राजेश मुथा, नीलेश पहाडे, जी. एम. बोथरा, डॉ. प्रकाश झांबड आदी उपस्थित होते.
विनोद बोकडिया म्हणाले, महावीर जयंतीच्या दिवशी राजाबाजारातील जैन मंदिरापासून वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी ७ वाजता महावीर स्तंभ येथे सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा आणि कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होईल. त्यानंतर उत्तमचंद ठोळे जैन छात्रालय, गुरूगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण होईल. सकाळी ८ वाजता पैठणगेट ते औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालय प्रांगणापर्यंत रथयात्रा काढण्यात येईल. कचरा आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याच्या उद्देशाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीवाटप, शीतपेय, आइस्क्रीम आदींमुळे कचरा निर्माण होतो. तो टाळण्यासाठी हे खाद्यपदार्थ बंद करून स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी देण्यात येणार आहे.
रथयात्रेच्या सांगतानंतर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात महाप्रसाद होईल. यावर्षी स्व. डॉ. चंपालालजी देसरडा यांच्या स्मृतीत प्रभादेवी देसरडा, शेखर चंपालाल देसरडा आणि देसरडा कुटुंबीय महाप्रसादाचे लाभार्थी आहेत. सकाळी १० ते २ दरम्यान रक्तदान शिबीर, थालेसेमिया चेकअप शिबीर आणि रोपट्यांचे वाटप होईल. पीरबाजार चौक (उस्मानपुरा), भगवानबाबा आश्रम, मातोश्री वृद्धाश्रम आणि हेडगेवार रुग्णालयात अन्नदान करण्यात येईल.
१०८ कारची रॅली
ज्युनिअर सिडको रॉयल जैन ग्रुपतर्फे यावर्षी १०८ कारच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचावो-बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू-संतांची शिकवण आणि भगवान महावीर यांचे सामाजिक, धार्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. ही वाहन रॅली सकाळी ६.०० वा. सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरापासून निघेल आणि भगवान महावीर स्तंभ येथे समारोप होईल.
‘महावीर रसोई घर’गाडीचे लोकार्पण
जयंतीनिमित्त महावीर रसोई घरगाडीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हे रसोई घर ३६५ दिवस घाटी रुग्णालयात रुग्ण आणि गरजूंसाठी अन्नदान करणार आहे. गरजूंसाठी संपूर्ण जेवण मोफत देण्याची व्यवस्था केली आहे.