औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:25 AM2018-07-27T00:25:54+5:302018-07-27T00:27:10+5:30

मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.

Aurangabad garlic, potato expensive; Chillies, onion cheap | औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

औरंगाबादेत लसूण, बटाटा महाग; मिरची, कांदा स्वस्त

googlenewsNext
ठळक मुद्देसातवा दिवस : मालवाहतूकदारांच्या आंदोलनाचा परिणाम; फळे आणि भाजीपाल्याची आवक साठ टक्क्यांनी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मालवाहतूकदारांच्या चक्का जाम आंदोलनाच्या सातव्या दिवशी जाधववाडीतील फळ आणि भाजीपाला बाजारावर परिणाम दिसून येत आहे. परराज्यातून आवक घटल्याने लसूण, बटाटा महागला आहे, तर परराज्यात येथून माल जात नसल्याने येथील मिरची, कांदा आणि अद्रकचे भाव घसरले आहेत.


फळे आणि भाजीपाला यांची आवक साठ टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी परराज्यातून केवळ १४ ट्रक माल शहरात आला. जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून फळभाज्या घेऊन ४ ट्रॅक्टर व १४५ लहान वाहने आली. दर गुरुवारी शहरात बटाट्याची १५० ते २०० टन आवक होत असते. मात्र, आज अवघे ५ ट्रक म्हणजेच ५० टन बटाटा विक्रीसाठी आला. सात दिवसांपूर्वी १,२०० ते १,३०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा बटाटा आता १,५०० ते १,६०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. हायब्रीड लसूण मध्यप्रदेशातून आणण्यात येतो; पण मागील ५ दिवसांपासून लसणाची आवक झाली नाही. आज अडत्यांकडील शिल्लक लसूणही विक्री झाला. ७ दिवसांपूर्वी १० ते १२ रुपये किलोने विक्री होणारा लसूण आज २० ते २५ रुपये किलोने विकला जात होता.
सिल्लोड, भोकरदन, आमठाणा, घाटनांद्रा आदी भागांतून दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांत जाणाऱ्या लवंगी मिरचीवर मालवाहतूकदारांच्या संपाचा मोठा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याची मालवाहतूक थांबल्याने अखेर येथील शेतकºयांना आसपासच्या बाजारपेठेत मिरची विकावी लागत आहे. यामुळे मिरचीचे भाव गडगडले आहेत. आज जाधववाडीत १५ टन लवंगी मिरचीची आवक झाली. एरव्ही ३० रुपये किलोपर्यंत विकली जाणारी ही मिरची आज १५ ते २० रुपये किलो विकली जात होती. जळगाव, नाशिक जिल्ह्यांतूनही १० टन चिपाटा मिरची आली. १५ ते २० रुपये किलो दरानेही या मिरचीला खरेदीदार मिळत नव्हते.
फुलंब्री, गणोरी, पिशोर, सिल्लोड आदी भागांतून अद्रक मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश, गुजरातला विकायला जाते. मात्र, आता सर्व अद्रक आसपासच्या जिल्ह्यांतच विक्रीला पाठवावी लागत आहे. क्विंटलमागे हजार रुपये कमी होऊन आज ४ हजार ते ५ हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे. दर कमी झाले असले तरी निम्मी अद्रक विक्रीविना पडून आहे, अशी माहिती इसा खान यांनी दिली. येवला, वैजापूर येथून एरव्ही चांगल्या प्रतीचा कांदा नाशिक, पुणे, मुंबईकडे जातो; पण आता हा कांदा जाधववाडीत येऊ लागला आहे. यामुळे कांद्याचे भाव ३०० रुपयांनी घटून ९०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले. काशीफळाचे भावही निम्म्याने कमी होऊन ३०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याचे इलियास बागवान यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad garlic, potato expensive; Chillies, onion cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.