औरंगाबादला डिसेंबरपर्यंत वाढेल २० एमएलडी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:02 AM2021-06-09T04:02:06+5:302021-06-09T04:02:06+5:30
औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली ...
औरंगाबाद : शहराला सध्या १२० एमएलडी पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात पाण्याची गरज ही १८० एमएलडी आहे. ‘एमजेपी’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. सर्व यंत्रणा कामाला लावून डिसेंबरपर्यंत २० ‘एमएलडी’ने पाणीपुरवठा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.
घाटी रुग्णालयात सोमवारी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. औरंगाबादच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या समन्वयासाठी शासनाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. सुनील चव्हाण म्हणाले, औरंगाबादला डिसेंबरपर्यंत २० एमएलडी पाणी वाढविण्याचे नियोजन केले आहे. तर मार्च २०२२ पर्यंत आणखी ३० एमएलडी पाणी वाढविले जाईल. म्हणजे मार्चपर्यंत एकूण ५० एमएलडी पाणी वाढेल, अशा पद्धतीने काम करण्यावर भर आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता
आपले पुढील लक्ष्य औरंगाबाद- शिर्डी हा रस्ता आहे. हा रस्ता तयार होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ३०० कोटी शिर्डी संस्थान आणि ३५० कोटी शासनाच्या निधीतून हा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. विद्यापीठात १२ कोटींचा ट्रॅक केला जाणार आहे. त्याचाही प्रस्ताव तयार केला आहे. औट्रम घाटाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. या सर्व गोष्टी औरंगाबादसाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.