औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात होणार ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:01 PM2019-08-01T23:01:14+5:302019-08-02T00:08:56+5:30
जागाही निश्चित, शास्त्रोक्त पद्धतीने रक्त काढणे, यंत्रसामुग्रीच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू होणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून तपासणीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने रक्त काढणे, यंत्रसामुग्रीचे व्यवस्थापन आदींसंदर्भात राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना घाटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल.
हे सेंटर उभारण्यासाठी १८ मार्च रोजी घाटीत सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, विकृतीशास्त्र विभाग आणि जीवरसायनशास्त्र विभागाची दिल्लीच्या चार सदस्यीय पथकाने पाहणी केली होती. पाहणीनंतर पथकाने सोयी- सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. त्यामुळे हे सेंटर सुरू होण्याची अपेक्षा घाटी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. अखेर सेंटर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (एनएसीओ), बी. डी. आणि सी.एम.ए.आय. यांच्या माध्यमातून हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
या सेंटरसाठी घाटीतील जुन्या ग्रंथालयाची जागा देण्यात आली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. लवकरच सेंटरचे काम सुरू होईल, असे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुखडॉ.ज्योती इरावणे म्हणाल्या.
विविध तपासण्यांसाठी रुग्णाचे रक्त घेताना अनेकदा आवश्यक प्रमाणात घेतले जात नाही, तर कधी-कधी रुग्णाला त्रास होतो. रक्त घेताना होणाºया चुकांमुळे तपासणीचे अहवाल चुकतात. त्यामुळे उपचाराची दिशाही भरकटण्याची शक्यता असते. प्रशिक्षणामुळे या चुका टळण्यास मदत होईल.
अहवाल येतील योग्य
यंत्रसामुग्रीची देखभाल योग्य पद्धतीने न केल्यासही रक्त तपासणीचे अहवाल चुकतात. त्यामुळे यासंदर्भात नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन यांना योग्य प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण या सेंटरच्या माध्यमातून मिळेल.