औरंगाबादमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी समाधान हेल्पलाईन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:56 PM2018-09-14T13:56:44+5:302018-09-14T13:57:24+5:30
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिकाला सोमवारी पाचशे रुपयांच्या लाचेप्रकरणी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी मांडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी हे दक्षतेचे व सतर्कतेचे पाऊल उचलले आहे.
पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास तीन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची विविध कामे मुख्यालय, पोलीस ठाणे स्तरावर असतात. ही कामे वेळेवर होत नाहीत, विलंबाने केली जातात, मुद्दामहून अडवून ठेवली जातात किंवा कामांसाठी लाचही मागितली जाते. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद रुजू झाल्यापासून त्यांनी हळूहळू पोलीस प्रशासनाला कार्यक्षम बनविण्यावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात आहेत. लाच घेताना एकाला अटक होताच पोलीस आयुक्तांनी हे प्रकार टाळण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याची कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठी पोलिसांनी समाधान हेल्पलाईन (०२४०-२३२६५२७) सुरू केली आहे.
हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार
या हेल्पलाईनवर कर्मचारी बिनधास्तपणे आपल्या तक्रारी मांडू शकणार आहेत. खरे तर ही हेल्पलाईन चार महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती; परंतु याबाबत कर्मचाऱ्यांना फारशी माहिती नसल्याने या हेल्पलाईनला प्रतिसादही मिळाला नव्हता. आता या प्रकरणानंतर पुन्हा हेल्पलाईन अॅक्टिव करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली आहे.