शिक्षकांच्या वेतनातून सव्वा कोटी रुपयांची कपात केल्या प्रकरणी शिक्षण सचिवांना खंडपीठाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:43 PM2018-06-22T16:43:00+5:302018-06-22T16:45:36+5:30
नांदेड जिल्ह्यातील २० शिक्षकांच्या वेतनातून सव्वा कोटी रुपये कपात केल्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्याचे शिक्षण सचिव, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला.
औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील २० शिक्षकांच्या वेतनातून सव्वा कोटी रुपये कपात केल्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्याचे शिक्षण सचिव, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला. याचिकेत पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.
बिलोली तालुक्यातील तीन प्राथमिक शाळांमधील २० शिक्षकांनी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार ३ मार्च ते २६ मे २०१४ या काळात त्यांची शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. शिक्षणसेवकपदाच्या कालावधीनंतर त्यांची सेवा नियमित करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. वेतनाची रक्कम संस्थेच्या संयुक्त खात्यात जमा होते; परंतु एलआयसी, सहकारी बँक, क्रेडिट सोसायटी या नावाखाली २०१६ ते २४ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत शिक्षकांचे सव्वा कोटी रुपये कपात करण्यात आल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले.
ही रक्कम बेकायदेशीर कपात केल्याचा आरोप करीत शिक्षकांनी प्रशासनाकडे दाद मागितली. तसेच बिलोली पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली; परंतु काहीच कार्यवाही न झाल्याने शिक्षकांनी अॅड. रामराव बिरादार यांच्यामार्फत याचिका दाखल केली. सुनावणीअंती न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला.