रूग्णाला जीवदान हवे ना? मग...सलाईन घेऊन उभे रहा, स्ट्रेचर ढकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:10 AM2018-05-10T01:10:35+5:302018-05-10T11:30:00+5:30
घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होण्यासह औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री तर शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यास स्टॅण्ड उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आठवर्षीय बालिकेला ती बाटली तब्बल अर्धा तास उंच धरून उभे राहावे लागले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होण्यासह औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. औषध विभागापासून अपघात विभाग ते सिटीस्कॅन, एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना स्ट्रेचरवरून ढकलत नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. सोमवारी रात्री तर शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यास स्टॅण्ड उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आठ वर्षीय बालिकेला ती बाटली तब्बल अर्धा तास उंच धरून उभे राहावे लागले.
संपूर्ण मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यातील रुग्ण घाटीत उपचारासाठी दाखल होतात. घाटीतील रुग्णांवरील उपचारासाठी निष्णात डॉक्टरांसोबत प्रशिक्षित परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सेवक घाटीत कार्यरत आहेत. असे असले तरी घाटीत दाखल होणाऱ्या रुग्णांना रोज धक्कादायक अनुभव येतात. कधी डॉक्टरांकडून अरेरावी सहन करावी लागते. औषधींचा तुटवडा तर रोजचाच झाला. सोमवारी रात्री मात्र धक्कादायक घटना घडली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला वॉर्ड क्रमांक १८ मध्ये दाखल करण्यात आले होते. वॉर्डात सलाईन लावणारे स्टँड नसल्याने कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या आठवर्षीय मुलीच्या हातात सलाईनची बाटली देऊन तिला उभे केले. वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी बालिकाही विनातक्रार हातात सलाईनची बाटली धरून उभी राहिली. मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजता सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांना हे दृश्य दिसले. हृदयाला पाझर फोडणारे हे दृश्य पाहून घाटीतील कर्मचारी, डॉक्टरांना काहीच वाटले नाही, याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी वॉर्डातील कर्तव्यावरील परिचारिकांना विनंती केल्यानंतर काही वेळाने सलाईनचे स्टॅण्ड उपलब्ध करण्यात आले.
स्ट्रेचर ढकलण्याची करावी लागते नातलगांना कसरत घाटीच्या विविध वॉर्डांत दाखल होणाऱ्या रुग्णांना एक्स रे, सिटीस्कॅन करण्यासाठी नेणे व परत आणणे, शस्त्रक्रियागारात रुग्णाला नेणे आणि नंतर पुन्हा स्ट्रेचरवरून वॉर्डात दाखल करणे, आदी कामे करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात चतुर्थश्रेणी कर्मचारी तैनात असतो. एवढेच नव्हे, तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचे अधिकार वॉर्डातील नर्सेस आणि डॉक्टरांना आहेत; मात्र बऱ्याचदा वॉर्डातील चतुर्थश्रेणी कर्मचारी गायब असतात. परिणामी एखाद्या रुग्णाला एक्स रे, सिटीस्कॅन, अथवा एमआरआयसारख्या तपासणीसाठी तात्काळ घेऊन जा, असे डॉक्टरांकडून नातेवाईकांना सांगितले जाते. तपासणीनंतर पुढील उपचाराची दिशा ठरणार असते, ही बाब लक्षात घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा न करता नातेवाईक त्यांच्या रुग्णांना स्ट्रेचरवर झोपवून स्वत: स्ट्रेचर ढकलत संबंधित विभागात नेतो आणि आणतो. हा प्रकार रोजच घाटीत अनुभवायला येतो.