औरंगाबादेत उद्योजक, कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला; तीन जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:33 PM2019-01-31T12:33:23+5:302019-01-31T12:45:32+5:30
बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारासचा थरार
औरंगाबाद : उद्योजकाच्या घरात घुसून कुटुंबियांवर खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जालना रोडलगत रघुवीरनगरात घडली. उद्योजक पती-पत्नीसह १७ वर्षांचा नातू गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यात पारस छाजेड (७८), शशिकला छाजेड (७०), पार्थ आशिष छाजेड (१७) गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
छाजेड कुटुंबातील पाच व्यक्ती या बंगल्यात राहत असून, बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घराची बेल वाजल्याने पारस छाजेड यांनी लोखंडी दार उघडले. हल्लेखोराने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्यावेळी शशिकला छाजेड त्यांच्या मदतीला धावल्या, आरडाओरड ऐकून त्यांचा नातू पार्थ आशिष छाजेड (१७) खोलीतून बाहेर आला. त्याच्यावरही कोयत्याने हल्ला करून हल्लेखोराने तिघांनाही गंभीर जखमी केले. पार्थची आई विधि या वरच्या मजल्यावरील खोलीत होत्या. त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत मदतीसाठी आरडाओरडा केल्याने नागरिक मदतीला धावले; परंतु अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर अंधारात पळून गेला.
उद्योजक कुटुंबावर प्राणघातक हल्ला कशामुळे केला, याचे कारण समजले नाही. घरातून काय चोरी गेले, याचीही माहिती उशिरापर्यंत समोर आली नव्हती. घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. घराबाहेर (पान १ वरून) असलेल्या आशिष छाजेड यांना फोन करून पत्नीने घटनेची माहिती देत घरी बोलविले. त्यांंनी जखमींना खाजगी रुग्णालयात नेले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्ही बंद
बंगल्यातील सीसीटीव्ही बंद असल्याने बाहेरून कोण आले आणि हल्ला करून पळून गेले, याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले नाही; परंतु रघुवीरनगरातील विविध बंगल्यांसमोर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलीस रात्री उशिरापर्यंत तपासत होते. हल्लेखोर हा जॅकीट घातलेला होता आणि तो दुसऱ्या बंगल्यावर उडी मारून पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घरातील आरडाओरडा ऐकून आजिनाथ बडक हा सुरक्षारक्षक जागी झाला. तो बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खोलीत होता. यावेळी पोलीस उपायुक्त राहुल खाडे, तसेच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक वसूलकर, गुन्हे शाखेचे राहुल सूर्यतळ घटनास्थळी तातडीने दाखल झाले.