दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:43 AM2019-12-12T11:43:15+5:302019-12-12T11:46:57+5:30
शिर्डीतील खराब वातावरणाने विमानांच्या उड्डाणांनी क्षमता झाली स्पष्ट
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. स्पाईस जेट आणि इंडिगोच्या विमानांचे शिर्डी विमानतळावरून होणारे उड्डाण खराब वातावरणामुळे काही दिवसांसाठी औरंगाबाद विमानतळावरून झाले. नियमित आणि अतिरिक्त अशा २० विमानांची दिवसभरात ये-जा होत होती. त्यातून औरंगाबाद विमानतळाची क्षमता स्पष्ट झाली असून, भविष्यात विमानसेवा वाढण्यासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्पाईस जेटने चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरूहून शिर्डीला जाणारी विमाने २२ नोव्हेंबरपासून औरंगाबादहून उड्डाण करीत होते. स्पाईस जेटपाठोपाठ ‘इंडिगो’नेही औरंगाबादहून विमानांचे संचालन करण्याचे नियोजन केले. बुधवारपासून स्पाईस जेटची विमाने पूर्वीप्रमाणे शिर्डीहून झेपावण्यास सुरुवात झाली. तर इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू शहरांसाठी ‘इंडिगो’चे विमान १५ डिसेंबरपर्यंत औरंगाबादहून ये-जा करणार आहे. स्पाईस जेटची अतिरिक्त विमानसेवा कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर वाढलेली गजबज आता कमी झाली आहे. १५ डिसेंबरनंतर विमानतळावर केवळ नियमित विमानांच्या प्रवाशांची गर्दी राहिल.
चिकलठाणा विमानतळावरून नियमित १० विमानांची ये-जा आहे. यामध्ये उदयपूरचे विमान आठवड्यातून ३ दिवसांसाठी उड्डाण घेत आहे. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता असल्याचे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले. शिर्डी येथील विमाने औरंगाबादला वळविण्यात आल्याने गेली काही दिवस दिवसभरात उड्डाण घेणाºया विमानांची संख्या २० वर गेली होती. वाढलेल्या विमानांची आणि प्रवासी संख्येची सक्षमपणे हाताळणी केली गेली. त्यातून औरंगाबाद विमानतळ व्यवस्थापनाची क्षमता स्पष्ट होत आहे. याचा भविष्यात विमानसेवा वाढण्याच्या दृष्टीने फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबादमुळे स्लॉट वाचले
शिर्डी येथील खराब वातावरणामुळे तेथील विमानतळावरील विमानांचे उड्डाण ठप्प झाले होते. अधिक दिवस उड्डाण ठप्प राहिल्यास विमानांचे ‘स्लॉट’ (उड्डाणाची वेळ) रद्द होण्याची शक्यता असते. मात्र स्लॉट कायम राहण्याच्या दृष्टीने औरंगाबादहून उड्डाण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.