औरंगाबादमध्ये सहा हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग अखेर मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:08 AM2020-02-12T06:08:35+5:302020-02-12T06:08:59+5:30
बिडकीनमध्ये प्रकल्प; रशियन कंपनी करणार गुंतवणूक
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औरंगाबादनजीकच्या बिडकीनमध्ये नोवोलिपस्टेटक स्टील (एनएलएमके) ही रशियन कंपनी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यासाठी करांमध्ये काही प्रोत्साहन देण्याची आणि त्यासाठीचा कालावधी वाढवून देण्याची कंपनीची मागणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील विशाल प्रकल्प धोरण उच्चाधिकार समितीने मान्य केली.
स्टील उद्योगक्षेत्रात आघाडीची एनएलएमके ही कंपनी पहिल्या टप्प्यात ८४० कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात ५ हजार कोटी रुपयांची अशी एकूण सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. उच्चाधिकार समितीने कंपनीची मागणी मान्य करताना आता कंपनीने पहिल्या टप्प्यात ४५ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्चाधिकार समिती आता कंपनीला कर प्रोत्साहन देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठवेल. उच्चाधिकार समितीची शिफारस ही उपसमिती जसाच्या तसा स्वीकारते हा साधारणत: नेहमीचाच अनुभव आहे. त्यानुसार, आता एनएलमएके कंपनीला जीएसटी, मुद्रांक शुल्क आदींमध्ये विशेष प्रोत्साहन मिळेल. प्रोत्साहन सवलतीसाठीचा अवधी १५ वर्षांपर्यंत वाढवून द्यावा, अशी कंपनीची मागणी होती. मात्र, तो १२ वर्षांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एनएलएमकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन औरंगाबादमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर शासनाने कंपनीला प्रकल्पासाठी जमीनही उपलब्ध करून दिली होती. एनएलएमके ही जगातील अव्वल स्टील कंपन्यांमध्ये गणली जाते.
आजच्या बैठकीला मुख्य सचिवन अजोय मेहता, जीएसटी कमिशनर संजीवकुमार, एमआयडीसीचे सीईओ पी.अनबलगन आदी उपस्थित होते.
पहिलाच प्रकल्प
एनएलएमके कंपनीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. त्याची उभारणी आॅरिक सिटीमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) करण्यात येणार आहे.