विशेष रेल्वेंच्या यादीतून औरंगाबाद गायबच; उन्हाळी सुट्यांत गर्दीतूनच करावा लागणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:20 PM2022-05-06T20:20:12+5:302022-05-06T20:20:54+5:30

तिरुपती आणि रेल्वेच्या परीक्षार्थींसाठी जबलपूरपुरतीच विशेष रेल्वे

Aurangabad is missing from the list of special trains; During the summer holidays, you have to travel through the crowds | विशेष रेल्वेंच्या यादीतून औरंगाबाद गायबच; उन्हाळी सुट्यांत गर्दीतूनच करावा लागणार प्रवास

विशेष रेल्वेंच्या यादीतून औरंगाबाद गायबच; उन्हाळी सुट्यांत गर्दीतूनच करावा लागणार प्रवास

googlenewsNext

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन केले जात आहे, तर अनेक जण गावी जात आहेत. रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या अनेक रेल्वेंचे आरक्षण फुल्ल आहे. अशा परिस्थितीत द. म. रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. परंतु औरंगाबादकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. परंतु गोवा, केरळ, राजस्थान, जयपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. प्रत्येक उन्हाळ्यात मागणी करूनही विशेष रेल्वे सोडण्याकडे कानाडोळा केला जातो. वाढीव बाेगी आणि एखाद्या विशेष रेल्वेवरच प्रवाशांना समाधान मानावे लागते, अशी ओरड रेल्वे संघटनांतून होत आहे.

जबलपूरसाठी कधी रेल्वे?
रेल्वे भरती बोर्ड नाॅन टेक्निकल पाॅप्युलर कॅटेगरीच्या परीक्षार्थींसाठी ७ मे रोजी जबलपूर ते नांदेड आणि ९ मे रोजी नांदेड ते जबलपूर विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. नांदेड-जबलपूर ही रेल्वे ९ मे रोजी नांदेडहून औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रात्री १.२० वाजता येईल आणि रात्री १.२५ वाजता रवाना होईल.

नेहमीच दुर्लक्ष
औरंगाबादहून विशेष रेल्वे सोडण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार मागणी करूनही गोवा, केरळ, राजस्थान, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नाही. इतर शहरांसाठी कधी विशेष रेल्वे देणार, असा प्रश्न आहे.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

Web Title: Aurangabad is missing from the list of special trains; During the summer holidays, you have to travel through the crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.