औरंगाबाद-जालना महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 05:58 PM2018-04-21T17:58:35+5:302018-04-21T17:59:08+5:30
समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट हब, डिएमआयसी प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षात औरंगाबाद-जालना हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन असतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पु
औरंगाबाद : समृद्धी महामार्ग, ड्रायपोर्ट हब, डिएमआयसी प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षात औरंगाबाद-जालना हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन असतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुण्याशी स्पर्धा करू शकेल एवढी क्षमता औरंगाबादेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबादेतील निर्लेप उद्योगाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम वाळून महानगरातील मराठवाडा अॅटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात आयोजित केला होता. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरउड्डाण, वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभु, विधासभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील, खासदार चंद्रकात खैरे, निर्लेप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा राम भोगले, मुकूंद भोगले यांची उपस्थित होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद शहरात प्रचंड पोटॅन्शिअल आहे. राज्यातील सर्वाधिक सजग उद्योजक औरंगाबादचेच आहेत. देश-विदेशात गुंतवणूकीसंदर्भात फिरताना, बोलताना जपान, कोरियन, अमेरिकन कंपन्यांनी राज्यात औरंगाबादलाच प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागील ५० वर्षात निर्लेप उद्योग समुहानेही औरंगाबादचे नाव जगाच्या कानाकोपºयात पोहचविल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, मराठवeड्याची विचारधारा पुढारलेली आहे. प्रत्येक क्षेत्राचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. औरंगाबादेत जपानचे १०० पेक्षा अधिक उद्योग येण्यास उत्सुक आहेत. यासाठी जपानी कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टर होऊ शकेल काय? याचा विचारही करण्यात येत असल्याचे प्रभूंनी सांगितले. प्रस्ताविकात निर्लेप उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकूंद भोगले यांनी ५० वर्षांचा आढावा घेतला. १९६८ मध्ये सुरू झालेल्या या उद्योगाने काळानुसार बदलण्यास प्राधान्य दिले. यात कुटुंबीय संबंध उत्तम राहिल्यामुळे उद्योगाची भरभराट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन आणि आभार राम भोगले यांनी केले. कार्यक्रमाला उद्योग, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती.
मेट्रोला मान्यता द्या : खैरे
मुख्यमंत्र्याकडे दोन मागण्या मागत आहे. यात रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वे पटरीवर उड्डाणपूला प्रश्न मार्गी लावावा आणि वाळूज, बिडकीन, शेंद्रा, वाळूज याम मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा प्रकल्पाला मंजूर देण्यात यावी,अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाषणात केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मागण्याकडे दुर्लक्ष करत बोलण्याचे टाळले.
आधी कच-याचे पहा : बागडे
खा. खैरे यांनी केलेल्या मेट्रोच्या मागणीचा संदर्भ घेत विधासभाध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, मेट्रो ठिक आहे. त्याला मंजूरी द्या, पण आधी कच-याचा प्रश्न सोडवा, असे सांगताच सभागृहात हशा पसरला.
धंद्यावाल्यांचा भरवसा राहिला नाही : दानवे
उद्योजक राम भोगले यांच्याकडे अनेक वर्षांपासून जातो, बसतो पण त्यांनी कधी धंद्याचे गुपित उघड केले नाही. यामुळे मी सुद्धा त्यांना कधी राजकारणातले बारकावे सांगितले नाही. मात्र आता काळ बदलला आहे. धंद्यातले लोक कधी राजकारणात येतील याचा भरवसा राहिला नसल्याची कोपरखीळी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी राम भोगलेच्या संभाव्य राजकारणातील प्रवेशाव हाणली. तेव्हा सर्वत्र हशा पिकला. विधासभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे राम भोगलेंना उद्योगात काही नाही. त्यांना वेगळे काम देण्याची मागणी केली.