औरंगाबादेत सराफाचे दुकान फोडून सहा किलो चांदी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:03 AM2018-07-14T00:03:28+5:302018-07-14T00:04:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सिडको एन-९, एम-२ येथील सराफा दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडून आणि दुकानाचे शटर उचकटून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-९, एम-२ येथील सराफा दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडून आणि दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे पाच ते सहा किलो चांदीची मोड चोरून नेली. ही घटना गुरुवारी उत्तररात्री ३.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त माहिती अशी की, सिडको एन-९ मधील एम-२ येथील शॉपिंग मार्के टमध्ये मुकेश अशोक सोनार यांचे भक्ती पर्ल आणि ज्वेलर्स हे दुकान आहे. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानाचे शटर आणि समोरील लोखंडी ग्रिलच्या गेटला कुलूप लावून ते घरी गेले. रात्री ३.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या लोखंडी ग्रिलचा कोंडा तोडला. त्यानंतर आतील शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात सीसीटीव्ही असल्याचे चोरट्यांना आधीच माहीत असावे, म्हणून चोरट्यांनी त्यांचे चेहरे झाकलेले होते. यावेळी त्यांनी दुकानातील सुमारे पाच ते सहा किलो चांदीची जुनी मोड घेऊन तेथून पोबारा केला. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारे नागरिक सकाळी फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास जाऊ लागले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने त्यांनी या घटनेची माहिती दुकानदाराला कळविली. त्यानंतर सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेला माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, मधुकर सावंत, उपनिरीक्षक शेख आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, हा श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळला.
सीसीटीव्हीत चोरटे कैद...
सोनार यांनी त्यांच्या दुकानात, तसेच त्यांच्या शेजारील अन्य एका दुकानाबाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला त्याचवेळी अन्य दोन चोरटे दुकानाबाहेर उभे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे परिसरातील एका सीसीटीव्हीत चोरट्यांची कार कैद झाली. यामुळे चोरट्यांनी पळून जाण्यासाठी कारचा वापर केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दुकानाच्या गल्ल्यातील रोकड आणि अन्य वस्तू ‘जैसे थे’...
या दुकानात सोन्याचे अलंकार आणि वस्तू तिजोरीत ठेवलेल्या होत्या. मात्र, चांदीच्या अन्य वस्तू मोठ्या संख्येने दुकानात होत्या. शिवाय गल्ल्यातही चार ते पाच हजार रुपयांची रोकड होती. या वस्तूंना आणि गल्ल्यातील पैशांना चोरट्यांनी हात लावला नाही. एवढेच नव्हे, तर तिजोरीकडेही ते गेले नाही.